कामयानी एक्‍सप्रेस पटरीवरून घसरली; संदेश व्हायरल होताच भरली धडकी.. पण सत्‍य आले बाहेर

राजेश सोनवणे
Monday, 28 September 2020

जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या कामयानी एक्‍सप्रेसचे तीन डबे पटरीवरून घरसल्‍याने अपघात झाल्‍याने साऱ्यांची धावपळ उडाली. म्‍हसावद रेल्‍वे स्‍टेशनजवळ सदर अपघात झाल्‍याचा संदेश व्हायरला झाला होता. यास रेल्‍वे प्रशासनाने देखील दुजोरा दिल्‍यानंतर एक तासानंतर रेल्‍वे अपघाताबाबत प्रशासनाने माहिती दिल्‍यानंतर सदर प्रकार समोर आला.

जळगाव : जळगाव ते शिरसोलीच्या दरम्यान दुपारी रेल्वे घसरल्याचा संदेश सर्वत्र पाठविण्यात आल्यानंतर खळबळ उडाली असतांना हे मॉक ड्रील करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

अप कामयानी एक्सप्रेस (०१०७२) जळगाव स्‍टेशनवरून सुटून मुंबईकडे रवाना झाली. जळगाव स्‍टेशन सोडल्‍यानंतर शिरसोली- म्हसावद दरम्यान ट्रेनचे तीन डबे घसरल्याची बातमी समोर आली. एक्‍सप्रेसचे तीन डबे घसरल्‍याने मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू करण्यात आले. या भिषण अपघातात किती जणांचा बळी गेला आणि काय नुकसान झाले; याबाबत कोणत्‍याही प्रकारची माहिती नसताना रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देखील अपघाताला दुजोरा देण्यात आला आहे. 

एक तासानंतर केले जाहीर
जळगाव ते शिरसोली दरम्‍यान अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या अपघाताला रेल्वे प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आला. तथापि, सुमारे एक तासानंतर हे मॉक ड्रील असल्याची अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. सुरवातीला हा अपघात अप लाईन खंबा क्रमांक ४०३/२३ जवळ घडल्‍याचे सांगून उच्च अधिकाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतल्‍याचे देखील जाहीर करण्यात आले होते. सुरवातीला अपघात झाल्‍याचे रेल्वे प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आला. पण एक तासानंतर कोणत्‍याही प्रकारचा अपघात नसून मॉक ड्रील असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon kamyani express accident massage viral railway mock drill