जळगावात शेवटच्या आठवड्यात कोरोना लस; पहिल्‍या टप्प्यात यांना मिळणार लस 

देविदास वाणी
Sunday, 6 December 2020

लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीयसह खासगी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफ, अधिकारी यांची माहिती केंद्र सरकारला जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जळगाव : जगभरात हाहाकार उडविणाऱ्या कोरोनावर येणाऱ्या लशीचे संशोधन अंतिम टप्प्यात असून, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लस जिल्ह्यात उपलब्ध होणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. लसीकरणाचा प्राधान्यक्रमही ठरविण्यात आला असून, आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वांत आधी लस देण्यात येईल, त्यासाठी मागविण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातून शासकीय व खासगी यंत्रणेतील सुमारे १४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवडाभरात देशात लस उपलब्ध होण्याचे संकेत दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात डिसेंबरअखेर लस उपलब्ध होणार आहे. 

लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीयसह खासगी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफ, अधिकारी यांची माहिती केंद्र सरकारला जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे माहिती संकलित करण्यात येत आहे. सुमारे १४ हजार डॉक्टर, नर्स, इतर स्टाफ, लॅब टेक्निशियन, असिस्टंट आदींची माहिती संकलित करण्यात आली आहे. ती राज्य शासन व केंद्र सरकारकडे पाठविली आहे. कोरोनाचा जवळचा संबंध आरोग्य विभागात काम करणाऱ्या सर्वच घटकांशी येतो. यामुळे आरेाग्य क्षेत्रातील सर्वांना कोरोना लसीकरण अगोदर केले जाणार आहे. 

माहिती संकलित
जिल्हा रुग्णालयातर्फे अशी माहिती एकत्रितरीत्या संकलित करून ती संगणकावर भरली गेली आहे. जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रासाठी किती लशी लागतील, याचा अंदाज घेऊन राज्यांना जिल्हानिहाय लस उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. 
 
जिल्ह्यातील सर्व खासगी व शासकीय आरोग्याधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स, इतर स्टाफची माहिती संकलित करून केंद्राला पाठविण्यात आली आहे. १४ हजार जणांचे प्रथम लसीकरण करण्यात येईल. 

-डॉ. एन. सी. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon last week corona vaccination on health deparment staff