ना रश्शा‍चा खमंग...ना मिष्टान्नाचा मधुर सुगंध! 

ना रश्शा‍चा खमंग...ना मिष्टान्नाचा मधुर सुगंध! 

जळगाव : कोरोना संसर्गामुळे वर्षभरापासून लग्नसोहळे व अन्य समारंभांवर मर्यादा घातल्यामुळे मंगल कार्यालये ओस पडलेली... टेंटचा बाजारही उठलेला... त्यामुळे या सोहळ्यांमधून निघणारा रस्सेदार भाजीचा खमंग अन्‌ मिष्टान्नाचा मधुर सुगंधही हरवून गेलेला. या सोहळ्यांमध्ये रात्रंदिवस राबून खवय्या पाहुण्यांची खातिरदारी करत हजारोंची क्षुधा भागविणाऱ्या केटरर्सवरही वर्षभरापासून लॉकडाउनमुळे उपाशी राहण्याची दुर्दैवी वेळ आलीय. किरकोळ कामे घेणाऱ्या सामान्य आचाऱ्यांपासून मोठे कॉन्ट्रॅक्ट घेणारे केटरर्स, त्यांच्याकडे राबणाऱ्या कामगारांची वर्षभरापासून होरपळ होतेय. जळगाव शहरासह जिल्ह्यातील सुमारे १५ ते २० हजार लोक यामुळे प्रभावित झाले. 

केटरर्सवर अवकळा 
गेल्या वर्षी मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाउन झाला आणि यंदा सलग दुसऱ्या वर्षी ऐन लग्नसराईत कोरोना व त्याअनुषंगाने लॉकडाउनचे सावट कायम आहे. त्यामुळे वर्षभरापासून या संपूर्ण इव्हेंट इंडस्ट्रीवर उपासमारीची वेळ आली आहे. सोहळ्यांमध्ये सर्वांत प्रमुख व्यवस्था म्हणजे भोजनाचे नियोजन सांभाळणारी यंत्रणाही यात होरपळून निघाली आहे. 

जिल्ह्यात शंभरावर केटरर्स 
जळगाव शहरासह जिल्ह्यात मोठ्या सोहळ्यांचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे शंभरावर केटरर्स, तर लहान-मोठी कामे करणारे चारशेपेक्षा अधिक कारागीर आहेत. यात बहुतांश राजस्थानी, गुजराथी, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील महाराज आहेत. जळगाव शहरात ममुराबाद रोडलगत प्रजापतनगर ही खास केटरर्स, आचारी- महाराजांची वस्ती विकसित झाली आहे. 

सर्वांचेच बुकिंग रद्द 
वर्षभरापासून दीडशेपेक्षा अधिक लग्नतिथींच्या तारखांना असलेले स्वयंपाकाचे बुकिंग सर्वच केटरर्सला रद्द करावे लागले. दिवाळीनंतर जानेवारीअखेरपर्यंत काही लग्नतारखांना मिळालेले काम तेवढे करता आले. मात्र, बहुतांश तारखांचे बुकिंग रद्द झाल्याने केटरर्स, आचाऱ्यांच्या हाताला काम नाही. 

आता दिवाळीपर्यंत प्रतीक्षा 
एप्रिल व मे-जूनच्या तारखाही रद्द होत आहेत. त्यामुळे आता दिवाळीनंतरच्या सीझनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे सावट दिवाळीवरही होते. त्यामुळे दिवाळीतील फराळांचा सीझनही वाया गेला. आता पुन्हा दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याने तोपर्यंत या कारागिरांसह त्यांच्याकडील कामगारांची उपासमार निश्‍चित आहे. 

अशी आहे संख्या 
-मोठे केटरर्स : ५० पेक्षा अधिक 
-साधारण आचारी- महाराज : ४०० वर 
-त्यांच्याकडील कामगार : सुमारे १० हजारांवर 
-ट्रान्स्पोर्टवरील कामगार : एक हजार 

गेल्या वर्षीचा पूर्ण सीझन वाया गेला. डिसेंबर, जानेवारीत थोडी कामे झाली. मात्र आता एप्रिल ते जूनदरम्यान खूप अपेक्षा असताना पुन्हा निर्बंध जारी झाले. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी हा फटका बसत आहे. यातून सावरणे कठीण असून, आमच्याकडील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
-दिनेश टाटिया, केटरर्स 

गेल्या वर्षी घेतलेली कामे ऐनवेळी लॉकडाउनमुळे रद्द झाली. सर्व समारंभ रद्द झाल्याने डिसेंबरपर्यंत आमच्या हाताला काम नव्हते. आताही तीच स्थिती आहे. हा सीझनही वाया जाणार असल्याने आमच्यासह जे लोक कामाला आहेत, त्यांचाही रोजगार बुडाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
-शिवा महाराज तिवारी, केटरर्स  

 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com