esakal | लॉकडाउनमध्‍ये तरूणाई याच ऑनलाइन लिंकवर...पालक चिंतेत
sakal

बोलून बातमी शोधा

online game

शालेय मुले, तरुणांनी गेम्स व अन्य निरुपयोगी ॲपचा वापर अजिबात करु नये. अभ्यास आणि माहिती मिळविण्याच्या दृष्टीने मर्यादि स्वरुपात मोबोईलचा वापर करणे योग्य. वयाच्या या टप्प्यात मुलांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी पालकांनी अधिक सजगतेने घेतली पाहिजे. 
- डॉ. प्रदीप जोशी (मनोविकार तज्ज्ञ) 

लॉकडाउनमध्‍ये तरूणाई याच ऑनलाइन लिंकवर...पालक चिंतेत

sakal_logo
By
अमोल महाजन

धानोरा (ता.चोपडा) : कोरोना व्हायरसच्या महामारीने संपूर्ण जगाला हैराण करून सोडले आहे. कोविड-१९ व्हायरसची साखळी तोडण्यासाठी गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाउन करण्यात आला आहे. परिणामी सर्व शाळा महाविद्यालये बंद असल्याने तरुणाई सध्या ऑनलाइन गेम्स खेळण्यात व्यस्त असून या गेम्सचा विळखा तरुणाईभोवती अधिक घट्ट झाला आहे. त्यातून मानसिक आजार, नैराश्‍य असे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. 

पबजी या गेमने सध्या चांगलाच धूमाकुळ घातला असून तरुणाई दिवस-रात्र गेम खेळण्यात व्यस्त आहे. पबजी या गेमच्या विळख्यात तरूणाई सापडली असल्याने त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्यात मानसिक आजारही बळावत असल्याने पालकांची चिंताही वाढली आहे. पबजी या व्हिडिओ गेमने तरूणाईला भुरळ पाडली असून आपल्या खोलीत कैद होऊन तासन्‌तास गेम खेळतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

मानसिक आजार बळावले 
यापूर्वी देखील पोकेमॉन गो, ब्लू व्हेल यासारख्या गेम्सनी मुलांना वेड लावले होते. त्यात आता पबजी गेमची भर पडली आहे. या गेममधील विविध खेळामुळे मुलांमध्ये आक्रमक स्वभाव वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. मुळात या ‘अॅक्शनपॅक्ड’ खेळांचे मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होत असतात. या खेळांचा प्रभाव असाच वाढता राहिला तर पुढची पिढी संवेदनाशून्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

सोशल मीडियाच्या जाळ्यात मुले 
भीतीचं आणि दुःसाहसाचं आकर्षण असलेली मानसिकता, जिंकण्याची ईर्ष्या यातून व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते, याचे हे वास्तव उदाहरण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या गेमच्या जाळ्यात मुलांना अडकवले जाते. चित्तथरारक, धाडसी गोष्टी करण्याची आव्हाने देणारा हा गेम आहे. या गेममध्ये प्रत्येक टप्प्यावर आव्हान दिले जाते. 

पालकांची चिंता वाढली 
स्मार्टफोन, लॅपटॉप आल्याने व्यक्ती आपसुक शहाणी, विवेकी होत नसते. ते शहाणपण येण्यासाठी एक समज विकसित होण्याची नितांत आवश्यकता आहे. एखाद्या कॉम्प्युटर गेमने, मोबाईल गेमने जीव घेतला जाऊ शकतो, ही कल्पना एखाद्या फिक्शनमध्येही अतिरंजित वाटली असती; मात्र ते प्रत्यक्षात घडते आहे. त्यामुळे अशा सोशल माध्यमांवरील गेमपासून रोखण्यासाठी सर्वप्रथम पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस मुलं ऑनलाइन गेमच्या आहारी जाऊ लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे. 
 

संपादन : राजेश सोनवणे