पक्षी निरीक्षणात पहिल्याच दिवशी ‘लॉंग लेग्ड बझार्ड’चे दर्शन ! 

राजेश सोनवणे
Thursday, 5 November 2020

पक्षी सप्ताहाची सुखद सुरवात हजारो किलोमीटरचा प्रवास करून शहरात दाखल झालेल्या ‘लॉंग लेग बझार्ड’ या परदेशी स्थलांतरित पक्षाच्या नोंदीने झाली.

 जळगाव ः पक्षी निरीक्षण सप्ताह साजरा करण्यात येत असून, सप्ताहाच्या पहिल्‍याच दिवशी शहरातील मेहरूण तलाव परिसरात ‘लाँग लेग्‍ड बझार्ड’ या पक्षाचे दर्शन झाले. तसेच पक्षी विविधता येथे असल्‍याचे निदर्शनास आले. 

आवश्य वाचा- पोलीस स्टेशन एक; भूमिपूजन दोनदा तर उद्‌घाटन तिनदा
 

पक्ष्यांसाठी आयुष्य वेचलेली आणि या क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेले पक्षीतज्ञ सलीम अली व पक्षीतज्ञ श्री मारुती चितमपल्ली हे दोन पक्षीतज्ज्ञ. या दोघांच्याही कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने व लोकांमध्ये पक्षीविषयक जाणीव- जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत सदर सप्ताहाचे आयोजन केल्या जाते. खानदेशातील वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे संपूर्ण सात दिवस सप्ताह साजरा केला जाणार आहे. यात आज (ता.5) जळगाव मेहरूण तलाव येथे सकाळी आठला पक्षीनिरीक्षण कार्यक्रम राबवून सप्ताहाचे उद्‌घाटन करण्यात आले. मेहरुण जलाशयावर पक्षी संख्या कमी असली तरी तलावात निर्माण झालेल्या दलदलीमुळे पक्षी विविधता वाढत असल्याची सुखद बाब निदर्शनात आल्याची नोंद वन्यजीवच्या पक्षी अभ्यासकांनी केली. मेहरुण येथील पक्षीनिरीक्षण शिबिरात पक्षी अभ्यासक राहुल सोनवणे, अध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, प्रसाद सोनवणे, रवींद्र सोनवणे, अमन गुजर, विनोद बुवा, सुरेंद्र नारखेडे, सहभागी झाले होते. तर संस्थेच्या इतर टीमने तापी काठ भुसावळ, वाघूर बॅक वॉटर या ठिकाणी निरीक्षण केले. 

स्‍थलांतरीत परदेशी पक्षी 
पक्षी सप्ताहाची सुखद सुरवात हजारो किलोमीटरचा प्रवास करून शहरात दाखल झालेल्या ‘लॉंग लेग बझार्ड’ या परदेशी स्थलांतरित पक्षाच्या नोंदीने झाली. लाँग लेग्ड बझार्ड हा हिवाळ्यात हिमालयातून पाकिस्तान, आसाम, बांग्लादेश व दक्षिणेकडे स्थलांतर करतो. हा आपल्याकडे आढळणाऱ्या ईतर बझर्ड प्रजातींपेक्षा आकाराने मोठा असुन रंगाने भुरकट आहे. त्याच बरोबर आययुसीएन रेड डेटा लिस्टमध्ये समाविष्ट रिव्हर टर्न देखील आढळून आल्याने पक्षीमित्र सुखावले. 

नोंदवण्यात आलेले पक्षी 
लॉंग लेग बझार्ड, कॉटन पिग्मी गुज, कॉमन कूट, ग्लॉसी आयबीस, व्हाईट आयबीस, अलेक्झांडरिन पॅराकिट, लेसर व्हीसीलिंग डक, पाईड मैना, कॉमन मुरहेन, मधुबाज, कमळ पक्षी, बुटेड ईगल, आणि इतर असे 52 प्रजातीचे पक्षी नोंदवण्यात आले. यात एक समाधान कारक बाब म्हणजे कॉमन कूट, लिटिल ग्रेब व इतर पक्षांच्या पिलांची नोंद याचा अर्थ म्हणजे आता पक्षांचा अधिवास सुरक्षित होतोय असा निष्कर्ष काढता येईल. 

वाचा- पंधरा दिवसांवर होता मुलीचा विवाह; तत्‍पुर्वीच दुःखाचा डोंगर, वडिलांनी फोडला हंबरडा

 

हिवाळी पक्षी येण्याची अपेक्षा 
तलावाच्या पश्चिमेस उथळ पाण्यात टायफा, हायड्रिला, पोटँमोगेटॉन, नाजास, लिम्नोफीला तसेच पानवेत व पानकणीस यासारख्या वनस्पतींच्या वाढीमुळे चांगली जलीय परिसंस्था विकसित झाली आहे. परिणामतः पाणपक्षीही पाहावयास मिळत आहेत. येणाऱ्या काळात तलावावर अजुन चांगल्या संख्येने हिवाळी स्थलांतरीत पक्षी येतील अशी आशा आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon long legged buzzard on the first day of bird watching