esakal | जनजीवन मिशनअंतर्गत राज्यातील प्रत्येक घराघरापर्यंत पाणी!
sakal

बोलून बातमी शोधा

Janjivan Mission

जनजीवन मिशनअंतर्गत राज्यातील प्रत्येक घराघरापर्यंत पाणी!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव ः जनजीवन मिशनच्या (Janjivan Mission) माध्यमातून २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी (Water) पोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी राज्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद केली आहे. जळगाव (Jalgaon) ,धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यांसाठी दोन हजार २५ गावांत तीन हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी तब्बल एक हजार २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कोणालाही तहानलेले राहू देणार नसल्याचा संकल्प राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी केला.

(maharastra state janjivan mission under water supply to every house hold)

हेही वाचा: रेमडेसिव्हिर उपचारातून बाद मात्र वापर सुरूच!

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी जळगावला नवीन मंडल कार्यालय सोमवारपासून सुरू झाले. त्याचे उद्‌घाटन मंत्री पाटील यांनी केले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार लता सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अधीक्षक अभियंता शिवशंकर निकम उपस्थित होते.

हेही वाचा: झोटिंग समितीच्या अहवालाचे गौडबंगाल..!

दरडोई ५५ लिटर पाणी
मंत्री पाटील म्हणाले, की जनजीवन मिशन अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असून, जिल्ह्यातील साडेआठशे गावांसाठी याअंतर्गत तब्बल एक हजार २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आधी अनेक पाणीयोजना अमलात आल्या, तरी त्यात अनेक त्रुटी दूर करून ही योजना अमलात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे याआधीच्या योजना दरडोई ४० लिटर पाण्याच्या निकषावर आखल्या होत्या. त्या जनजीवन मिशन ५५ लिटर दरडोई निकषावर आखली आहे. स्वच्छता विभागातर्फे घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी जळगाव जिल्ह्याला तब्बल ३१४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यात वैयक्तिक शोषखड्डे, कचराकुंडी, सामूहिक शौचालयांसह इतर बाबींचा सामावेश आहे. सदस्य सचिव निंबाळकर यांनी जनजीवन प्राधिकरणात राज्यभरात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले. श्री. निकम यांनी आभार मानले.

हेही वाचा: जळगावमध्ये 'क्लाउड कव्हर' नसल्याने पाऊस बेपत्ता


योजनांना गती येणार
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मंडळ कार्यालय जळगावला झाल्याने स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा योजनांना गती येणार आहे. नवीन मंडळ कार्यालयामुळे वेळेची बचत होणार असून, नियंत्रण सोपे होणार आहे. जनजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ८७८ गावांसाठी तब्बल एक हजार २०० कोटींची तरतूद केली आहे. येत्या तीन वर्षांत चारशे ते पाचशे कोटी निधीच्या योजनांसाठी खर्ची घालावे लागतील.

loading image