esakal | मैत्रेयचे गुंतवणूकदार हवालदिल
sakal

बोलून बातमी शोधा

anvestor

मध्यमवर्गीयांनी कमाईतील रक्कमेचा काही हिस्सा बचत म्हणून मैत्रेय प्लॉटर्स व स्ट्रक्चर्स, मैत्रेय रिएक्टर्स ॲन्ड कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या जळगाव शाखेमध्ये ठेवली होती. या ठेवीची मुदत संपल्यानंतरही कंपनीकडून कुठल्याही स्वरूपाचा परतावा देण्यात आलेला नाही.

मैत्रेयचे गुंतवणूकदार हवालदिल

sakal_logo
By
सुनील पाटील

चोपडा : राज्यासह देशभरातील लाखो ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या आर्थिक घोटाळा प्रकरणाची स्थिती नेमकी काय आहे, हे अजूनही गुंतवणूकदारांना ठाऊक नसल्यामुळे सामान्य जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे. चोपडा तालुक्यातील वर्डी येथील १६ गुंतवणूकदारांनी थेट पंतप्रधान, केंद्रीय गृहसचिव, मुख्यमंत्री यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार केल्याने या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 
मध्यमवर्गीयांनी कमाईतील रक्कमेचा काही हिस्सा बचत म्हणून मैत्रेय प्लॉटर्स व स्ट्रक्चर्स, मैत्रेय रिएक्टर्स ॲन्ड कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या जळगाव शाखेमध्ये ठेवली होती. या ठेवीची मुदत संपल्यानंतरही कंपनीकडून कुठल्याही स्वरूपाचा परतावा देण्यात आलेला नाही. ठेवीच्‍या रक्कमेसाठी कागदपत्रांची वेळोवेळी पूर्तता केली असून, अद्याप रक्कम मिळालेली नसल्याची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहसचिव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मेलद्वारे पाठविली असून, याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी राज्याचे गृहसचिव, सामाजिक न्याय विभाग यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 
गुंतवणूकदारांना दुप्पट पैसे तर नाहीच, शिवाय मुद्दलही मिळत नसल्याने ठेवीदारांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणात फसवणुकीबद्दल राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी मैत्रेय कंपनीमध्ये कोट्यवधीची गुंतवणूक केल्याचे समोर आले होते. या प्रकरणात फक्त नाशिक जिल्ह्यात मैत्रेय कंपनीच्या ठेवीदारांना दीड कोटी वाटप झाले. या प्रकरणातील फसवणूक झालेल्या जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात‌ आपली गुंतवणूक ठेवीची रक्कम दिली जाणार आहे, असे सांगण्यात आले होते. ज्या गुंतवणूकदारांनी तक्रार केली नसेल त्यांनी जिल्ह्यातील संबंधित पोलिस ठाण्यात पॉलिसीची माहिती नमुन्यात भरून ती पेन ड्राइव्हमध्ये भरून आणावी, असे आवाहन गुंतवणूकदारांना त्यावेळी प्रशासन तसेच कंपनीच्या वतीने करण्यात आले होते. गुंतवणूकदारांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत माहिती दिली. या घटनेस पाच ते सहा महिने पूर्ण झाली; परंतु ठेवीदारांना कंपनीकडून कुठल्याही स्वरूपाचा परतावा मिळालेला नाही. 

या गुंतवणूकदांरांनी केली तक्रार 
शांताराम जयसिंग कोळी, इंदूबाई मच्छिंद्र धनगर, राजेंद्र पुरुषोत्तम सुतार, राधाबाई महारू पाटील, उषाबाई प्रताप धनगर, हिलाल शिवराम पाटील, राजेंद्र अमृत सोनवणे, रवींद्र मच्छिंद्र धनगर, सुरेश अभिमन धनगर, आनंदा रामदास धनगर, रंजनाबाई पांडुरंग पाटील, विजूबाई राजेंद्र पाटील, पुरुषोत्तम अभिमन धनगर, तुकाराम अमृत कुंभार, रुखमाबाई नारायण बागल, कल्पना राजेंद्र मिस्तरी. 
 
जिल्‍ह्यातील ठेवीदार ः दोन हजार ५५१ 
अडकलेली रक्‍कम ः पाच कोटी ७६ लाख ६४ हजार ६०० 

संपादन : राजेश सोनवणे