esakal | स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांसाठी बक्षिसांची लयलुट; ‘माझी वसुंधरा’ अभियान 
sakal

बोलून बातमी शोधा

majhi vasundhara abhiyan

माझी वसुंधरा" अभियानात संपूर्ण राज्यातील 667 स्थानिक स्वराज्य संस्थाची निवड केली आहे. यामध्ये वृक्षारोपण, जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, निसर्गाचे संवर्धन, पर्यावरण सुधारणा व संरक्षण या मुद्यांना 1500 पैकी गुण दिले जाणार आहेत.

स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांसाठी बक्षिसांची लयलुट; ‘माझी वसुंधरा’ अभियान 

sakal_logo
By
सुनील पाटील

चोपडा (जळगाव) : निसर्गाशी असलेली कटीबद्धता निश्चित करण्यासाठी, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच जैवविविधतेचे अस्तित्व टिकवून ठेवणे यासाठी शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्याचा मार्ग म्हणून ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यातील 667 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविला जात आहे. त्यासाठी 2 ऑक्टोबर ते 31 मार्च 2021 या कालावधीत विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. 
अभियानांतर्गंत पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाणार आहे. यात पृथ्वी घटकासाठी वृक्षारोपण झाडांची संख्या, भारतीय प्रजातीच्या झाडांची टक्केवारी, पर्यावरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, रेन वॉटर हार्वेस्टिंग या मुद्द्याशी संबंधित कामे केली जातील. तर वायूतत्त्वासाठी प्रदुषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जलतत्त्वाशी संबंधित कामांमध्ये जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण, नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, अग्नी तत्त्वानुसार सौरऊर्जेचा वापर, उर्जा बचत, उर्जास्रोतास प्रोत्साहन, हरित इमारतीची संख्या, उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, आकाश तत्त्वात पर्यावरण सुधारणा व संरक्षण करण्यासाठी जनजागृती, उपक्रम, निसर्ग संवर्धन, हरित कायदा यावर भर दिला आहे.

दीड हजार गुण
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेवून तेथे या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्यासाठी "माझी वसुंधरा” हे अभियान राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुसार "माझी वसुंधरा" अभियानात संपूर्ण राज्यातील 667 स्थानिक स्वराज्य संस्थाची निवड केली आहे. यामध्ये वृक्षारोपण, जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, निसर्गाचे संवर्धन, पर्यावरण सुधारणा व संरक्षण या मुद्यांना 1500 पैकी गुण दिले जाणार आहेत. यानुसार या अभियानात स्पर्धेत निवड झालेल्या प्रत्येकी तीन स्थानिक स्वराज्य संस्थाना बक्षिसे दिली जाणार आहेत.

मनपा ते ग्रामपंचायतींचा सहभाग
"माझी वसुंधरा" अभियान राज्यात राबवले जाणार आहे. त्यामध्ये अमृत शहरे असलेल्या 43 मनपा, नगरपरिषद 226, नगर पंचायती 126 व ग्रामपंचायती 272 (10 हजारा पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या) आहेत. त्यापैकी रायगड, रत्नागिरी, गोंदिया जिल्ह्यांमध्ये 10 हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असल्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

कामांचे होणार मूल्यमापन
अभियानाच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध उपक्रमांचे मूल्यमापन 1 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 1 हजार 500 गुणांनुसार गुण दिले जाणार आहेत. यात पृथ्वी 600 गुण, वायू 100 गुण, जल 400 गुण, अग्नी 100 गुण, आकाश 300 गुण अशी विभागणी आहे. यामध्ये प्रत्येक घटकासाठी गुण ठरले आहेत. मूल्यांकनामध्ये प्रत्येक संस्था संवर्गातील तीन संस्थांना पर्यावरण दिनी 5 जूनला बक्षिस वितरण केले जाणार आहे. तसेच राज्यस्तरावरही निवड केली जाणार आहे.

अधिकाऱ्यांनाही बक्षिसे 
अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही राज्य शासनाकडून बक्षिसे दिली जाणार आहेत यात एक विभागीय आयुक्त, तीन जिल्हाधिकारी, तीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बक्षीस दिले जाणार आहे. हे अभियान यशस्वी करण्याची संपूर्ण जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे.

आकडे बोलतात 

कोकण विभाग 
- अमृत शहरे 11, नगरपरिषद- 20, नगरपंचायत 21, ग्रामपंचायत15 (10हजार पेक्षा जास्तलोकसंख्या) ग्रामपंचायत 20 (5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या)
- पुणे विभाग 
अमृत शहरे 8, नगरपरिषद 46, नगरपंचायत 17, ग्रामपंचायत 98
- नाशिक विभाग 
अमृत शहरे 7, नगरपरिषद 39, नगरपंचायत 16, ग्रामपंचायत 56
- औरंगाबाद विभाग 
अमृत शहरे 8, नगरपरिषद 48, नगरपंचायत 23, ग्रामपंचायत 37
- अमरावती विभाग 
अमृत शहरे 4, नगरपरिषद 38, नगरपंचायत 15, ग्रामपंचायत 35
- नागपूर विभाग 
अमृत शहरे 5, नगरपरिषद 35, नगरपंचायत 34, ग्रामपंचायत 6 (10हजार पेक्षा जास्तलोकसंख्या), ग्रामपंचायत 6 (5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या) 

संपादन ः राजेश सोनवणे