मेळघाट-अनेर संचार मार्ग प्रस्ताव लागणार मार्गी !

सचिन जोशी
Saturday, 17 October 2020

वन्यजीव अभ्यासक यांचाही समावेश करण्यात आला आहे. ही समिती संचार मार्गांचा सर्वंकष अभ्यास करून नव्याने प्रस्ताव तयार करणार आहे.

जळगाव : महाराष्ट्र राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्यासमवेत जळगाव जिल्ह्यातील वनप्रेमींची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत मेळघाट ते अनेर संचार मार्ग प्रस्तावावर चर्चा झाल्याने हा महत्त्वाचा विषय मार्गी लागण्यास मदत होणार आहे. 

बैठकीचे आयोजन धुळे वनवृत्त विभागाचे मुख्य वनसंरक्षक दिगंबर पगार यांनी केले. बैठकीत प्रामुख्याने मेळघाट ते अनेर अभयारण्यादरम्यान व्याघ्र संचारमार्गाचा विकास करण्यासाठी २०१३ मध्ये सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर व्यापक चर्चा झाली असून, या संचार मार्गाच्या विकासाच्या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे. 

हे आहे समितीत 
या समितीत श्री. पगार यांच्यासह नाशिक वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर, जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सामाजिक वनीकरण विभागाचे श्री. शेख आणि यावल वन विभाग, यावल वन्यजीव विभागाच्या अश्विनी खोपडे, अनेर वन्यजीव, बुलडाणा वन विभाग (श्री. गजबे), अंबावरुवा वन्यजीव विभाग, सर्व अधिकाऱ्यांसह राजेंद्र नन्नवरे, अभय उजागरे, राजेश ठोंबरे, अनिल महाजन, रवींद्र पालक, विवेक देसाई या संस्थेत क्षेत्रातील वन्यजीव अभ्यासक यांचाही समावेश करण्यात आला आहे. ही समिती संचार मार्गांचा सर्वंकष अभ्यास करून नव्याने प्रस्ताव तयार करणार आहे, त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या संचार मार्गाच्या प्रस्तावाला चालना मिळेल, अशी अपेक्षा वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. 

सुनील लिमये यांच्याकडे जळगाव जिल्ह्यातील वन्यजीव क्षेत्रातील प्रश्नांविषयी सविस्तर मागणीपत्र राजेंद्र नन्नवरे यांनी पाठविले होते. यामध्ये उपरोक्त संचार मार्गाच्या प्रस्तावासोबतच मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्राला धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास क्षेत्र घोषित करणे, डोलारखेडा वनक्षेत्रातील दोनशे एकर शेतजमीन ‘सीए’ किंवा ‘लँड’ बँक योजनेंतर्गत खरेदी करून शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देणे, मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्रांमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनविकास योजना लागू करणे व अन्य विषयांचा समावेश आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Melghat-Aner communication tigar route will be proposed