esakal | म्‍हणूनच सोनिया गांधींची शिवसेनेसोबत सत्‍ता स्‍थापनेस सहमती : ॲड. के. सी. पाडवी
sakal

बोलून बातमी शोधा

minister padvi

राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार स्थापन करताना काँग्रेसला शिवसेनेसोबत जाण्यास अडचण निर्माण झाली होती. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असल्यामुळे पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षांचे सरकार स्थापनेस नकार दिला होता.

म्‍हणूनच सोनिया गांधींची शिवसेनेसोबत सत्‍ता स्‍थापनेस सहमती : ॲड. के. सी. पाडवी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमूळे राज्यात शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास सोनिया गांधी यांचा नकार होता. मात्र, त्यांना आपण शिवसेनेचा हिंदुत्ववाद हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा वेगळा असल्याचे पटवून दिले. त्यामुळेच त्यांनी राज्यात शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास सहमती दिली, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री व काँग्रेसचे जिल्हा संपर्कमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी येथे दिली. 
ॲड. पाडवी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. माजी खासदार उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते. श्री. पाडवी म्हणाले, की राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार स्थापन करताना काँग्रेसला शिवसेनेसोबत जाण्यास अडचण निर्माण झाली होती. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असल्यामुळे पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षांचे सरकार स्थापनेस नकार दिला होता. मात्र, आपण स्वत: त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना संघ व शिवसेनेचा हिंदुत्ववाद वेगळा असल्याचे समजावून दिले. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्यास कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी मान्य केले. याशिवाय कॉंग्रेस पक्ष पाच वर्षांपासून विरोधात आहे. त्यामुळे पक्षाची ताकद कमी होत आहे. सत्तेत असल्यास पक्षाला ताकद मिळते, आज त्याची पक्षाला आवश्‍यकता आहे, हेसुद्धा सांगितले. 
 
काँग्रेसने सोडले अन्‌ भाजपने घेतले 
कार्यकर्त्यांच्या बळावरच काँग्रेस मोठी झाल्याचे सांगून ते म्हणाले, की सत्तेमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते जमिनीवर राहून कार्य करणे विसरले. मात्र, भाजपने नेमके तेच हेरले आणि त्यांनी कार्यकर्ते निर्माण केले. त्यांचे कार्यकर्ते जमिनीवर राहून कार्य करू लागले. त्यामुळे देशात आज त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. हे आपण सांगत नाही, तर भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने आपल्याला सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जमिनीवर राहून कार्य करण्याची गरज आहे. येत्या काळात पक्षाला निश्‍चितच चांगले दिवस येतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 
 

loading image