हप्त्‍याने काढलेला मोबाईल हरविला; फोन लावला तर बसला धक्‍का

अमोल महाजन
Saturday, 24 October 2020

आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्यावर भरवसा करणे जिकरीचे झाले आहे. परंतु याला अपवादही बरेच असून आजही मनुष्यात प्रामाणिक पणा असल्याचा प्रत्यय चोपड्याच्या जाधव दाम्पत्यास आला.

धानोरा (जळगाव) : धानोरा (ता. चोपडा) येथील झि. तो. महाजन माध्यमिक विद्यालय व ना. भा. पाटील ज्युनिअर कॉलेजचे उपक्रमशील उपशिक्षक एस. पी. महाजन यांना रस्त्यावर सापडलेला महागडा मोबाईल परत करत प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले.
चोपडा येथील रामपुरा भागातील रहिवाशी दिनेश रमेश जाधव हे २० ऑक्‍टोंबरला दहिगाव (ता. यावल) येथे नातेवाईकांकडे गेले होते. परत येतांना त्यांचा मोबाईल रस्त्यात कुठेतरी पडला. एस. पी. महाजन हे नियमितपणे सकाळी बऱ्हाणपुर- अंकलेश्वर या मार्गावर फिरायला गेले असता त्यांना हा मोबाईल रस्त्यावर पडलेला दिसला. त्यांनी मोबाईल सांभाळून ठेवला. जाधव यांचा ज्यावेळेस फोन आला; तेव्हा महाजन यांनी सांगितले की, तुमचा मोबाईल सुरक्षित आहे काळजी करु नका. तुम्ही धानोऱ्यात या आणि तुमचा मोबाईल घेऊन जा.

हप्त्‍याने घेतला मोबाईल
जाधव परीवार गरीब असुन मोलमजुरी करतात. मुलांच्या शिक्षणासाठी हफ्त्याने मोबाईल घेतला होता. त्याचा एकही हफ्ता भरला गेला नव्हता. मोबाईल हरवला असे माहीत झाल्याने ते ही निराश झाले. पण शिक्षकाच्या प्रामाणिकपणाने सदर मोबाईल पुन्हा मिळाल्याने त्यांना आनंद झाला. त्यांनी त्यांचे आभार मानलेत. एस. पी. महाजन यांच्या प्रामाणिक पणाचे परिसरात कौतुक होत आहे.

ग्रामपंचायत कार्यालयात केला परत 
दरम्‍यान धानोरा ग्रामपंचायत कार्यालयात असलेले पोलिस पाटील यांच्या कार्यालयात २३ ऑक्‍टोंबरला सदर मोबाईल परत देण्यात आला. यावेळी पोलिस पाटील दिनेश पाटील, ग्रामसेवक दिपक भामरे, तलाठी खुशबु तडवी, एस. पी. महाजन, सुरेंद्र महाजन यांनी गणेश रमेश जाधव यांच्या ताब्यात मोबाईल दिला.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mobile lost in installments but return proffecer