‘किक’साठी सनकी मॉडेलचे प्रताप; बाईक चालवत नेली होती तिसऱ्या मजल्‍यावर 

model pavan lokhande
model pavan lokhande

जळगाव : गणेश कॉलनीत एटीएम तोडण्याच्या प्रयत्नात एका तरुणाला रहिवाशांनी ताब्यात घेत धुतले...त्याच्या अंगावर अग्निअवरोधक नळकांडे फोडले... एटीएम फोडल्याच्या बातमीने धावत सुटलेल्या पोलिसांनी या तरुणाला बघताच पुन्हा कपाळाला हात लावून घेतला. कारण या सनकी तरुणाने त्यांना यापूर्वीही गोत्यात आणले असल्याने ‘खोदा पहाड निकला चुहा’ म्हणत त्याला कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतले. 

गजानन कॉलनीतील पंचविशीतील तरुण... सिनेकलावंतालाही लाजवेल असा देखणा... छंद मॉडेलिगं, फोटोग्राफी आणि बाइक सुसाट पळवण्याचा नाद. वडील रेल्वेत होते... आईही निवृत्त... अशा उच्चशिक्षित कुटुंबातील संस्कारी पुत्र. मात्र, वाईट संगतीत नशेच्या आहारी गेला आणि सनक आल्यावर काहीतरीच भयानक वेगळं करून तो पोलिस व यंत्रणेला आव्हान देतो. अटक होते, सुटतो परत तोच किस्सा... पवन लोखंडे त्याचे नाव... फेसबुकवर तो पवी रायडर्स म्हणून प्रसिद्ध आहे. 

एटीएमला केले लक्ष्य 
या तरुणाने गुरुवारी गणेश कॉलनीतील एटीएमलाच लक्ष्य केले. एटीएममध्ये शिरल्यावर त्याने कार्ड टाकून स्वाईप केले आणि त्याला जगातील अडीचशे देशांपैकी सर्वांत महागडे चलन या एटीएममधून हवे होते. (असे तो, पोलिसांना सांगतो) मात्र, पैसे निघत नसल्याने बेजार होऊन तो एटीएम यंत्राला जोरदार लाथा मारतो... सिगारेटची तलफ लागल्यावर एटीएममध्ये त्याने डोक्यावर काही तरी बारीक सिग्नलसारखी वाटी दिसल्याने ती वाटी ओढून घेतली. हीच वाटी मुळात ‘स्मोक सेन्सर’ असल्याने त्यातून धूर निघून परिसरातील रहिवाशांनी धाव घेतली. तरुणाला धरून चोपल्यावर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, तो सराईत नसल्याचे लक्षात येताच पोलिसांचा भ्रमनिरास झाला. 

तिसऱ्या मजल्यावर बाइक 
याच पवनने लॉकडॉउनआधी खानदेश सेंट्रलमधील आयनॉक्स चित्रपटगृहात चक्क तिसऱ्या मजल्यावर त्याची मोटारसायकल चालवत आणली होती. तेव्हादेखील त्याच्या या स्टंटमुळे गोंधळ उडाला होता. एकदा त्याची पोलिसांत तक्रार आल्यावर जिल्‍हापेठ पोलिसांनी फोन केला. त्याने पोलिसांना त्याचा दुचाकी नंबर, उभा असलेली जागा-ठिकाण सांगत ‘तुम्ही पोलिस आहे... तर मला पकडून दाखवा’ असे आव्हान दिले... पोलिस पळाले... त्याच्याजवळ आल्यानंतर त्यांना डिवचत तो सुसाट निघून गेला. दुचाकीचे पेट्रोल संपेपर्यंत पोलिसांना हैराण केल्यावर... खेळात हारलेल्या लहान मुलासारखा येत पोलिसांना अटक करण्यास सांगितले. 

आईची माया... 
पवन तसा हुशार, मित्रांमध्येही आवडता आणि गुणी आहे. मात्र, वाईट संगतीत त्याने नशा केली, की मग त्याच्यावर कुणाचे नियंत्रण राहत नाही. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात स्वतः अडचणीत सापडतो. पोलिस, लोकांकडून मारही खातो.. सर्व शांत झाल्यावर आई एकटीच त्याला सोडवण्यासाठी धावपळ करते. तोही चांगलं वागण्याचं वचन देतो.. नंतर पुन्हा एखादे नवे प्रकरण... 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com