esakal | दुर्दैवच..माता-पित्यापाठोपाठ मोठ्या मुलालाही ‘कोरोना’ने हिरावले

बोलून बातमी शोधा

दुर्दैवच..माता-पित्यापाठोपाठ मोठ्या मुलालाही ‘कोरोना’ने हिरावले

दुर्दैवच..माता-पित्यापाठोपाठ मोठ्या मुलालाही ‘कोरोना’ने हिरावले

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव : कोरोना महामारीने अवघे जग कवेत घेतले आहे. जिल्ह्यात तर अनेकांची कुटुंबच उद्ध्वस्त झाली आहेत. वीस दिवसांपूर्वीच आईवडिलांचे निधन झाल्यानंतर आता सोमवारी २६ एप्रिल रोजी पहाटे मोठ्या मुलाचेही कोरोनामुळे खाजगी दवाखान्यात दुर्दैवाने निधन झाल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे. काही दिवसांपूर्वीच मृत मुलाची पदोन्नती झाली होती.

एम.जे.कॉलेज मागील लक्ष्मीनगर येथील व मूळचे असोदा येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक दौलत सरोदे व त्यांच्या पत्नी शकुंतला सरोदे हे परिवारासह राहत होते. मागील मार्च महिन्यात त्यांना लक्षणे जाणवू लागल्यानंतर तपासणीअंती त्यांना कोरोना असल्याचे समजले. त्यांची प्रकृती त्यानंतर खालावत गेली. खाजगी रुग्णालयात दोघेही पती-पत्नी यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यातच डांभुर्णी येथून सेवानिवृत्त मुख्याध्यापिका राहिलेल्या शकुंतला सरोदे यांचे ३० मार्च रोजी तर ५ एप्रिल रोजी दौलत सरोदे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले.

घराची जबाबदारी आली अन..

घराची छत्रछाया असलेले आई वडील सोडून गेल्यानंतर त्यांच्या पश्‍चात दोन मुले पराग व कुंदन यांच्यावर घराची सूत्रे आली. मात्र काही दिवसानंतर मोठा मुलगा कुंदन यालाही कोरोना सदृश्य लक्षणे जाणवल्यावर तपासणीअंती त्यांनाही कोरोना असल्याचे दिसून आले होते. प्रकृती खालावल्यावर कुंदन सरोदे यांना खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना सोमवारी २६ एप्रिल रोजी त्यांची पहाटे प्राणज्योत मावळली.

कुंदन ‘महावितरण’ला अभियंता
कुंदन सरोदे हे मुंबई येथे महावितरण कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पदोन्नती झाली होती. २२ एप्रिल रोजी त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस देखील होता. आई, वडील यांच्या पश्चात तरुण मोठ्या मुलाचाही कोरोना महामारीमुळे मृत्यू झाल्याने मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कुंदन यांच्या पश्‍चात पत्नी मंजुषा, दोन वर्षाची मुलगी निष्ठा, भाऊ असोदा येथील विद्यालयाचे शिक्षक पराग, वहिनी व पुतणी असा परिवार आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे