...तर कोरोना विरोधातील लढाईत विजय 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

लढाईत नागरीकांनी प्रशासनास साथ देऊन दिलेल्या सुचनांचे पालन केले तर कोरोना विरोधातील लढाईत विजय मिळणार आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घेणे आणि कोरोनापासून दूर राहणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. 

जळगाव : जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था आदींच्या सहभागातून राबविली जात आहे. कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना नागरिकांची साथ महत्वाची आहे. या लढाईत नागरीकांनी प्रशासनास साथ देऊन दिलेल्या सुचनांचे पालन केले तर कोरोना विरोधातील लढाईत विजय मिळणार आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घेणे आणि कोरोनापासून दूर राहणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. 

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'या मोहिमेची सुरुवात पाळी (ता.धरणगाव) पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील होत्या. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, एरंडोलचे प्रांताधिकारी विनय गोसावी, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तहसीलदार नितिनकुमार देवरे, सरपंच अलकाबाई प्रकाश पाटील, आशाबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य, महसुल व आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते. 

'सेल्फ डिफेन्स' आवश्यक 
कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी घेणे हा या मोहीमेचा हा मुख्य उद्देश आहे. कोरोनाला रोखण्यासाठी 'सेल्फ डिफेन्स'वर (स्वसंरक्षण) भर देणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी, सॅनिटायझरचा वापर करणे, स्वच्छता आदीबाबत स्वयंसेवकांच्या सहाय्याने जिल्हाभर जनजागृती करावी. जिल्हा प्रशासनाने संपर्क यंत्रणांच्या आधारे आजारी व्यक्ती, संशयित व्यक्तींच्या शोध घ्यावा. असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. 

तपासणी स्वत:हून करा 
जिल्हाधिकारी राउत म्हणाले, की माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहिम आजपासून 24 ऑक्टोबरपर्यंत दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या बाबतीत नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. परंतु नागरीकांनी भिती न बाळगता स्वत:हून पुढे येऊन आपली व आपल्या कुटूंबाची तपासणी करुन घेतली पाहिजे. नागरीकांनी आपल्या घरी भेट देणा-या पथकांना सहकार्य करुन त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांची परिपुर्ण माहिती द्यावी व आपल्या कुटुंबाचा कोरोना या साथरोगापासून बचाव करावा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon my family my responsibility abhiyan start minister gulabrao patil