esakal | महिनाभरात घडल्या अशा १६ घटना; ज्‍यात कुटूंब उध्वस्‍त, पती- पत्नी मृत्यूच्या दहा घटना
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

महिनाभरात घडल्या अशा १६ घटना; ज्‍यात कुटूंब उध्वस्‍त, पती- पत्नी मृत्यूच्या दहा घटना

sakal_logo
By
उमेश काटे

अमळनेर (जळगाव) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड थैमान घातले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत महिनाभरात कोरोनासह इतर आजारांमुळे तालुक्यात पाठोपाठच्या मृत्यूच्या तब्बल १६ घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा तालुका ‘पाठोपाठच्या मृत्यूचा हॉटस्पॉट’ ठरत आहे. यात पती-पत्नी मृत्यूच्या दहा घटना, दोन सख्ख्या भावाच्या मृत्यूच्या चार, तर बाप-लेकाच्या मृत्यूच्या दोन घटनांचा समावेश आहे.

अमळनेर तालुका वर्षभरापासून कोरानामुळे हॉटस्पॉट ठरत आहे. सुरवातीला अधिक रुग्णसंख्येमुळे चर्चेत आला. त्यानंतर जिल्ह्यात शिक्षण विभागातील सर्वांत जास्त कर्मचारी तालुक्यात बाधित होऊन ३७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता तर हा तालुका पाठोपाठच्या मृत्यूचा केंद्रबिंदू ठरत आहे. या काळात अनेक नको असलेल्या गोष्टी घडल्याने तालुक्यावर जणूकाही संक्रांत कोसळली आहे.

पती-पत्नीचा सोबतच मृत्यू

दत्त हाउसिंग सोसायटीमधील सुनीता पाटील (वय ५५) यांचे कोरोनाने निधन झाले. त्यानंतर अवघ्या चारच दिवसानंतर त्यांचे पती प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्‍यामकांत पाटील (वय ६२) यांचे शुक्रवारी (ता.२३) निधन झाले. शिरुड नाका परिसरातील छायाचित्रकार राजनाथ पाटील (वय ६१) यांचे गेल्या पंधरवड्यात कोरोनाने निधन झाले. अवघ्या काही दिवसांतच त्यांच्या पत्नी कल्पना पाटील (वय ५५) यांचेही शनिवारी (ता.२४) कोरोनाने निधन झाले. पैलाड येथील निवृत्त केंद्रप्रमुख अरुण नेतकर (वय ७३) यांचे निधन झाले. मात्र चार दिवसातच त्यांच्या पत्नी निवृत्त शिक्षिका पुष्‍पा नेतकर (वय ६२) यांचे बुधवारी (ता. २१) अल्प आजाराने निधन झाले. शहरातील आयोध्यानगरमधील वृद्ध दांपत्याच्या मृत्यूची घटना शनिवारी (ता.२४) उघडकीस आली. दाजमल देवरे (वय ८५) व निलाबाई देवरे (वय ७५) यांचा मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. ते दोघे पती-पत्नी एकटेच घरात राहत होते.

दहिवद (ता.अमळनेर) येथील युवराज गोसावी (वय ६४) व सुमनबाई गोसावी (वय ५४) या पती- पत्नीचे निधन झाले. कांताबाई काटे (वय ५८) यांचे अल्प आजाराने निधन झाले. अवघ्या पाच दिवसांतच त्यांचे पती दिलीप काटे (वय ६५) यांचेही धसक्याने निधन झाले.

निवृत्त प्रा. शशिकांत काटकर (वय ६७) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. अवघ्या चार दिवसांनी त्यांच्या पत्नी पुष्पा काटकर (वय ६३) यांचेही कोरोनामुळे निधन झाले. पंचायत समितीत निवृत्त कर्मचारी अशोक मोरे (वय ६१) यांचे गेल्या आठवड्यात धुळे येथे निधन झाले. त्याच दिवशी त्यांच्या पत्नी श्रीमती मोरे यांचेही जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात निधन झाले.

शिवशक्ती चौकातील राजधर निकम (वय ६५) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. अवघ्या पाच तासांतच त्यांच्या पत्नी विमलबाई निकम (वय ५५) यांचेही हृदयविकाराने निधन झाले. पैलाड विभागातील निवृत्त शिक्षक पुंडलिक मोरे (वय ७३) यांचे हृदयविकाराने निधन झाले. अवघ्या अर्ध्या तासातच त्यांच्या पत्नी दमोताबाई मोरे (वय ६५) यांचेही निधन झाले.

सख्ख्या भावावर काळाचा घाला

टाकरखेडा (ता. अमळनेर) येथील प्रगतिशील शेतकरी अजबराव पाटील (वय ६८) यांचे गेल्या पंधरवड्यात निधन झाले. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच त्यांचे लहान बंधू अशोक पाटील (वय ६०) यांचेही निधन झाले. पवन चौकातील निवृत्त मुख्याध्यापक सुखदेवराव देशमुख (वय ९५) यांचे निधन झाले. अवघ्या दहा दिवसांतच त्यांचे सख्खे भाऊ चूडामण देशमुख (वय ९२) यांचेही निधन झाले. पातोंडा हायस्कूलचे उपशिक्षक जगदीश पवार (वय ५१) व निवृत्त उपप्राचार्य प्रा. नंदलाल पवार (वय ६२) या शिक्षक बंधूंवर बारा तासांतच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. नांद्री (ता. अमळनेर) येथील एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. यात निवृत्त शिक्षक विठ्ठल चौधरी (वय ६७), निवृत्त शिक्षक दिनकर चौधरी (वय ६३) या दोन सख्ख्या निवृत्त भावासह त्या कुटुंबातील निवृत्त शिक्षिका मीराबाई चौधरी (वय ७६) यांचेही निधन झाले.

पिता-पुत्रांचाही दुर्दैवी अंत

मुंदडानगरमधील निवृत्त माध्यमिक शिक्षक हिंमतराव पोपट मदने (वय ७३) यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत त्यांचे पुत्र मुख्याध्यापक नरेंद्र मदने यांचे कोरोनाने रविवारी (ता. १८) निधन झाले. श्रीकृष्ण कॉलनीतील रहिवासी तथा नाशिक येथे अभियंता म्हणून खासगी कंपनीत नोकरीस असलेले कपिल तवर (वय ३५) यांचे गुरुवारी धुळे येथे अल्प आजाराने निधन झाले. तीन आठवड्यांपूर्वीच कपिलचे वडील सुरतसिंग तवर (वय ६९) यांचे अल्प आजाराने निधन झाले होते.

संपादन- राजेश सोनवणे

loading image