esakal | पाच निकषांत ‘ग्रीन’, मृत्युदरात ‘रेड’ मार्क; जिल्ह्यातील संसर्गाचे चित्र

बोलून बातमी शोधा

jalgaon corona death ratio
पाच निकषांत ‘ग्रीन’, मृत्युदरात ‘रेड’ मार्क; जिल्ह्यातील संसर्गाचे चित्र
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या अहवालात पॉझिटिव्हीटी, रिकव्हरी, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आदी पाच निकषांत आकडेवारी ‘ग्रीन’ मार्क दाखविते तर मृत्युदरात मात्र राज्याच्या तुलनेत अद्यापही जळगाव जिल्हा ‘रेड’ मार्कवरच आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा गेल्या दोन आठवड्यांपासूनचा आलेख स्थिर आहे. नव्या रुग्णांच्या बरोबरीने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

अशी आहे स्थिती

मार्च २९ ते २५ एप्रिलपर्यंतच्या चार आठवड्यांत ५ ते ११ एप्रिलचा आठवडा वगळता साप्ताहिक रुग्णवाढ स्थिर आहे. २९ मार्च ते ४ एप्रिल यादरम्यान जिल्ह्यात ७७१६ रुग्ण वाढले, ५ ते ११ एप्रिलदरम्यान ८४८६ रुग्णांची वाढ झाली, १२ ते १८ एप्रिल या आठवड्यात ७५७६ रुग्णवाढ नोंदली गेली तर गेल्या सप्ताहात १९ ते २५ तारखेदरम्यान ७०२१ रुग्ण वाढले व ६२३५ रुग्ण बरे झाले.

मृत्युदर राज्यापेक्षा अधिक

पहिल्या लाटेत जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर राज्यात व देशातही अधिक होता. कोरोना संसर्गाच्या या टप्प्यातही तीच स्थिती आहे. संसर्ग कमी करण्यात यश मिळत असताना मृत्यूदर घटविण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. १९ ते २५ एप्रिल या गेल्या आठवड्यात जिल्ह्याचा मृत्यूदर १.६२ टक्के तर राज्याचा १.५१ टक्के राहिला.

गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे. सक्रिय रुग्णसंख्याही काही अंशी कमी होत आहे. परंतु, मृत्यूदर कायम असून गंभीर रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात तब्बल १७३७ रुग्ण ऑक्सिजनवर तर ८२० आयसीयूत आहे. उर्वरित जवळपास आठ हजार रुग्ण सौम्य लक्षणे असलेली आहेत.

या पाच निकषांत दिलासा

साप्ताहिक अहवाल सहा विविध निकषांनी तयार केला जातो, त्यावरुन त्या-त्या जिल्ह्यातील संसर्गाच्या स्थितीचे अवलोकन होत असते.

निकष-------------------जळगाव ---- राज्य

रुग्ण दुपटीचा काळ(दिवस)--७५.९८----४३.२६

सक्रिय रुग्णदर ------------११.८९----१६.२६

बरे होण्याचे प्रमाण---------८६.४६-----८२.१९

प्रति १० लाख रुग्ण--------१८१५०----३३८५९

पॉझिटिव्हीटी रेट-----------१०.६५-----१७.४१

साप्ताहिक वाढदर ----------६.५९------११.८७

संपादन- राजेश सोनवणे