esakal | लसीकरण मोहिमेला प्रशासनाकडून ठेंगा; केंद्रच बंद, नागरिकांची वणवण

बोलून बातमी शोधा

co vaccine
लसीकरण मोहिमेला प्रशासनाकडून ठेंगा; केंद्रच बंद, नागरिकांची वणवण
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ४५ वर्ष वयोगटावरील नागरिकांसाठी नोंदणी करुन कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत लसीकरणासाठी चालना देण्यात आली आहे. परंतु शासन निर्देशित कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र हे बहुतांश वेळा बंद असल्याचे दिसून येत आहे. लसीकरण केंद्रावर सकाळी सात वाजेपासून रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत देखील लस न घेताच परत जावे लागत आहे. तर लसीकरण केव्हा करण्यात येणार याविषयी ग्रामीण रुग्णालयात अधिकाऱ्यांशी माहिती घेतली असता काहीही माहीत नसल्याचे सांगत टोलवाटोलवी करताना दिसून आले.

नोंदणी केल्यानुसार नागरिकांना लस दिली जाण्यासाठी लसीकरण डोस घेऊन निघालेली वाहने जिल्हा स्तरावरून नियमित वेळेत रवाना केले जात आहेत. परंतु हि वाहने दुपारपर्यंत पोचतच नाहीत. आणि लसीकरण बंद असल्याचा बोर्ड लावण्यात येतात, मग जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लसीची मात्रा जाते कुठे? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एकूणच केंद्र शासनाच्या लसीकरण मोहिमेलाच स्थानिक स्तरावरूनच नव्हेतर जिल्हा प्रशासनांकडून ‘खो’दिला जात आहे.

१४२ केंद्रावर लसीकरण

जिल्ह्यात सुमारे १४२ लहान मोठ्या केंद्रांवर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीची मात्रा दिली जात आहे. यासाठी जिल्हास्तरावरून किमान १०० याप्रमाणे लसीची मात्रा सकाळी मिळेल अशा रीतीने वितरण केले जात आहे. परंतु बहुतांश लसीकरण केंद्रांवर लसीचा साठाच दुपारपर्यंत पोहोचत नाही. परिणामी सकाळी ७ वाजेपासून दोन ते तीन वाजेपर्यंत लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. जिल्ह्यात दर दोन दिवसांनी किंवा विभागस्तरावरुन निश्चित नियतनानुसार लसीची मात्रा प्राप्त होते. त्यानुसार जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामिण रुग्णालय, खाजगी रुग्णालयात विहित वेळेवरच वितरण करण्यात येत असल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु जिल्हास्तरावरून दुपारी २ वाजेपर्यंत लसीचा पुरवठा न मिळाल्याने धुमकेतू प्रमाणे अचानक आलेल्या कर्मचाऱ्यांनी आज लसीकरण बंद असल्याचा बोर्ड लावून उद्या या असे एका लसीकरण केंद्रावर सांगीतले गेले.

वेळेवर निघालेली लस जाते कुठे

स्थानिक स्तरावर लसीचा साठाच वेळेवर पोहोचत नाही. शिवाय दुपारपर्यंत उपाशीपोटी कंटाळून लाभार्थी थांबत नाहीत. त्यामुळे नियुक्त कर्मचाऱ्यांकडून हेतुपुरस्सर उशीरा पोचल्यामुळे लसीकरण बंद असल्याचा बोर्ड लावून जात आहेत. अशावेळी स्थानिक स्तरावर लसीचा आलेला साठा जातो कुठे? असा प्रश्न लसीकरणासाठी आलेल्या गोविंद पाटील, दादासाहेब गायकवाड, कुंदन विसपुते, स्नेहल काटकर, नयना पाटील, अनुसया बेलदार, लिना कापडे आदी नागरिकांनी केला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, व नंतर खाजगी रुग्णालयात अशा पद्धतीने नियोजनानुसार जिल्ह्यात सकाळपासून लसीचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी प्राप्त झालेले ९ हजार लसीची मात्रा शुक्रवार सायंकाळपर्यंत संपुष्टात आल्यानंतरच पुन्हा नव्याने शनिवारी साठा उपलब्ध होणार.

- डॉ. बी.टी.जमादार,जिल्हा आरोग्य अधिकारी