esakal | ‘अपशकुनी’ मानायचा..जन्मदात्याने तिला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवले उपाशी अन्‌ घेतला जीव

बोलून बातमी शोधा

girl murder
‘अपशकुनी’ मानायचा..जन्मदात्याने तिला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवले उपाशी अन्‌ घेतला जीव
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : पिंप्राळा हुडकोतील रझा कॉलनीतील एका शिक्षित वैद्यकीय प्रतिनिधीने स्वतःच्या ११ वर्षीय मुलीस तीन महिने डांबून ठेवत, अनन्वित छळ केला. त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप संबंधित मुलीच्या मामाने केल्यानंतर बुधवारी (ता. २८) पोलिसांनी मृतदेह उकरून काढून जिल्‍हा रुग्णालयात शवविच्छेदन, सीटी स्कॅन केले. त्यानंतर दुपारी पुन्हा तिच्यावर अंत्यसंस्कार झाले.

रझा कॉलनीत जावेद अख्तर शेख जमालोद्दीन हा पत्नी नाजिया परवीन, मुलगी कनीज फातेमा (वय ११), तहसीन फातेमा (९), अफिफा (४) यांच्यासह वास्तव्यास होता. चार महिन्यांपूर्वीच जावेदने भाडेतत्त्वावर घर घेतले होते. मुद्दाम ज्यादा पैसे देत त्याने तिसऱ्या मजल्यावरील घर निवडले होते. तेव्हापासून मुले आणि त्यांची आई कधीच घराबाहेर आली नसल्याचे बुधवारी उघड झाले.

घरासमोरच दफनविधी

शुक्रवारी (ता. २३) कनीज फातेमाचा मृत्यू झाला होता. वडील व दोन्ही काकांच्या उपस्थितीत घरासमोरील कब्रस्तानात तिचा दफनविधी करण्यात आला. मृत मुलीचा मामा अजहर अली याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चक्रे फिरवून जावेद अख्तर व त्याची पत्नी नाजिया परवीन यांना ताब्यात घेत दोघांची स्वतंत्र चौकशी केली. त्यातून मृतदेह उकरण्याचा निर्णय घेण्यात आला.

कबर उकरून शवविच्छेदन

कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासाधिकारी दीपक बिरारी, निरीक्षक अनिल बडगुजर आणि पंचासमक्ष मृत कनीज फातेमाची कबर खोदण्यात आली. मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात आणून सीटी स्कॅन आणि शवविच्छेदन करण्यात आले.

मुलगी ‘अपशकुनी’

कनीज फातेमाचा जन्म झाल्यानंतर नऊ दिवसांनी जावेदची आई वारली. नंतर त्याचे वैद्यकीय साहित्य आणि औषधी विक्रीचे दुकान जळाले. एमआरच्या नोकरीवरून काढून टाकले. त्यामुळे, मुलीचा पायगुण चांगला नाही म्हणून जावेद धरणगाव दर्ग्यावर एका बाबाच्या नादी लागला. तेथून तो, ताईत-गंडे आणत असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. कनीजला डांबण्यात आलेल्या खोलीतही ताईत आढळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

उच्चशिक्षित तरीही..

गुन्ह्यात संशयित पिता जावेद अख्तर स्वतः एमआर, त्याचे वडील अमळनेर महाविद्यालयात उपप्राचार्य, एक भाऊ वकील ॲड. साजीद, दुसरा भाऊ डॉ. फिरोज अख्तर असे उच्चशिक्षित व नावाजलेले कुटुंब असतानाही मुलगी अपशकुनी असल्याचे ठरवून तिला आजोळकडे पाठविले होते. आठ वर्षे तिथे राहिल्यावर शालेय अभ्यासात पहिली, दुसरी येणारी मुलगी अचानक मानसिक रुग्ण कशी झाली, असा प्रश्‍न तक्रारदार मामाने उपस्थित केला.

आई बोलते, पण..

पोलिस चौकशीत गप्प असलेल्या दोघांना वेगळे केल्यावर नाजियाची भेट तिच्या आईने व मृत मुलीच्या आजीने घेतली. पोलिसांनी तिचा जबाब चित्रित केला, कनीजच्या आईला बोलते केल्यावर कनीज जेवायला मागताना तिच्या पाठीत कुकर हाणून मारल्याने तिने चालणे बंद केले होते. तिचे हातपाय बांधून ठेवले जात होते. ‘बहोत राज‌ है, बदनामी होगी... मैं कुछ नहीं कर पायी... मुझे सजा मिलनी चाहीए असे...’ ती सांगू लागली. जावेदची प्रचंड दहशत आणि त्याच्याजवळ काहीतरी (अघोरी) विद्या असल्याचे ती सांगते.