esakal | ज्वारी, मका खरेदी रखडलेली..१७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी
sakal

बोलून बातमी शोधा

jowar corn kharedi

ज्वारी, मका खरेदी रखडलेली..१७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

sakal_logo
By
सुधाकर पाटील

भडगाव (जळगाव) : शासकीय हमीभावाने रब्बी हंगामातील ज्वारी, मका व गहू खरेदीसाठी जिल्ह्यातील तब्बल १७ हजार ३२९ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र अद्याप शासनाकडून खरेदीला मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माल कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्यांच्या घशात जाईल तेव्हा खरेदी सुरू कराल का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

शासनाकडुन गेल्या वर्षांपासून रब्बी हंगामातील ज्वारी व मका शासकीय हमीभावाने खरेदि करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी काही दिवसापुर्वी जिल्ह्यातील १७ खरेदी केद्रांवर नोंदणी करण्यात आली. मात्र अद्याप खरेदीची नाव नाही. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष खरेदीकडे डोळे लागून आहेत.

ज्‍वारीसाठी सर्वाधिक नोंदणी

जिल्ह्यात आजपर्यंत तब्बल १७ हजार ३२९ शेतकऱ्यांनी भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी. एन. मगरे यांनी सांगितले. त्यात ज्वारी खरेदीसाठी सर्वाधिक नोंदणी झाली आहे. १० हजार ६७९ ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर ६ हजार ५७४ शेतकऱ्यांनी मक्‍यासाठी नोंदणी केली आहे. ७६ शेतकऱ्यांनी गहू खरेदीसाठी आपली नोंदणी केली आहे. पारोळा तालुक्यात सार्वधिक ३ हजार ३१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांना प्रतिक्षाच

जिल्ह्यातील १७ हजार ३२९ शेतकऱ्यांनी भरड धान्य खरेदीसाठी नोंदणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात खरेदी केव्हा सुरू केली जाईल? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. मे महिना उजाळला तरी खरेदीला सुरवात नाही. खरीप हंगाम डोक्यावर आला. तो पेरायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहीला आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत प्रत्यक्ष सुरू करावी अशी मागणी शेतकर्याकडुन करण्यात येत आहे. शासनाने यात वेळकाढूपणा करू नये, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्याला माल विक्री झाल्यानंतर शासन खरेदी सुरू करेल असा ही प्रश्न यानिमित्ताने उपस्‍थित केला जात आहे.

खासगी व्यापाऱ्यांकडुन लुट

शासनाकडून अद्याप ज्वारी व मका हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांची नड पाहून खासगी व्यापारी हमीभावापेक्षा कमी भावाने धान्य खरेदी करत असल्याचे चित्र आहे. मक्याचा हमीभाव १ हजार ७६० ‌रूपये इतका आहे. मात्र प्रत्यक्षात मका १ हजार २०० ते १ हजार ४०० रूपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे. तर ज्वारीचा हमीभाव हा २ हजार ५५० प्रतिक्विंटल इतका आहे. पण बाजार समित्यांमधे १ हजार ३०० ते १ हजार ६०० रूपये दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. वास्तविक हमीभावापेक्षा कमी दराने धान्य खरेदी करू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र त्यांना वाटण्याच्या अक्षदा दाखविल्यात जात असल्याचे बाजार समित्यांमधील चित्र आहे.

केद्रंनिहाय खरेसाठी नोंदणी केलेल्या शेतकर्याची संख्या

खरेदी केंद्र.........ज्वारी.........मका

अमळनेर..........११८१.........५३७

चोपडा..............५४५.......४१५

पारोळा............२१७०......८५४

एरंडोल............९१५.........६०९

धरणगाव..........८७६........७५७

म्हसावद...........३३७........१६२

जळगाव...........४७६.........१५२

भुसावळ...........२५...........१६६

यावल..............१४...........१५४

रावेर.................५...........३०१

मुक्ताईनगर.........४८..........२२७

बोदवड............३४.............१६

जामनेर...........७५४..........१५१

शेदुंर्णी............४३६..........२४२

पाचोरा............८७०.........६५०

भडगाव..........१०६२..........५६०

चाळीसगाव........९३१...........६२०

loading image
go to top