esakal | चिमुकलीला सर्पदंशानंतर अंगात पसरले विष; लवकर उपचार न मिळाल्‍याने मृत्‍यू

बोलून बातमी शोधा

snake bite
चिमुकलीला सर्पदंशानंतर अंगात पसरले विष; लवकर उपचार न मिळाल्‍याने मृत्‍यू
sakal_logo
By
सुनील पाटील

चोपडा (जळगाव) : तालुक्यातील आदिवासी पाडा मेलाने (डेडियापाडा) येथील सलोनी शिवा पावरा (वय ९) हिला विषारी सर्पाने चावा घेतल्याने तिच्या पालकांनी तिला जवळील वैजापूर (ता. चोपडा) प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी तत्काळ दाखल केले. परंतु त्या वेळी संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पवार रात्रीची ड्यूटी असतानाही आपल्या कर्तव्यावर हजर नव्हते. त्या मुळे तिच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. सलोनी हीस चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा उपचाराअभावी शरीरात पसरलेल्या विषामुळे मृत्यू झाला. या सर्व प्रकारास वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पवार हे जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा अध्यक्ष दारासिंग पावरा यांच्यासह आदिवासींनी केली आहे.

सलोनी शिवा पावरा हिला ११ एप्रिलला अंदाजे रात्री आठला विषारी सर्पाने दंश केला. तिच्या पालकांनी तिला जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. त्या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पवार कर्तव्यावर हजर नव्हते. तेथील ऑनड्यूटी वॉर्डबॉयला विचारणा केली असता, त्याने कोणतेही उत्तर दिले नाही म्हणून सलोनी हीस चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

बेजबाबदारपणाने घेतला जीव

चोपडा आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांना या घटनेबाबत व डॉ. योगेश पवार यांच्या गैरहजरीबाबतीत विचारपूस केली असता, त्यांना योग्य माहिती देता आली नाही. तालुक्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदिवासी भागात किती बेजबाबदारपणे काम करत आहेत, हे इथेच सिद्ध होत आहे. या प्रकरणी या घटनेची पूर्ण चौकशी करून संबंधितांवर चार ते पाच दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी दिले आहे. ही घटना अतिशय संतापजनक, मन हेलावून टाकणारी अशी घटना आहे.

तत्काळ बडतर्फ करा

निष्काळजी आणि कर्तव्यहीन व्यक्तीस कठोर शासन होणे गरजेचे असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पवार यास तत्काळ बडतर्फ करण्यात येऊन त्यावर सदोष मनुष्यवधासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवून त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष दारासिंग पावरा यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री यांच्याकडे केली आहे.

संपादन- राजेश सोनवणे