esakal | वीस हजारांहून अधिक व्यक्तींनी मोडले नियम; ६३ हजाराचा दंड

बोलून बातमी शोधा

corona
वीस हजारांहून अधिक व्यक्तींनी मोडले नियम; ६३ हजाराचा दंड
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांसाठी नियमावलीही जाहीर केली. काही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने पोलिस व पालिका प्रशासनाने जिल्ह्यातील अशा २० हजार २६८ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ६३ लाख सहा हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ५७४ व्यक्ती व संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर २३ प्रतिष्ठाने सील करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली.

कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नियमावली ठरविली असून, मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडी ठेवणे, गर्दी करणे, कोविडच्या उपाययोजना न करणे आदींसह इतर कारणांसाठी दंडात्मक कारवाईचे निर्देश पोलिस, महापालिका व पालिका प्रशासनास दिले आहेत. असे असूनही काही नागरिक व आस्थापना कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

यासाठी दंड--व्यक्ती-- दंडाची रक्कम

सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे-- ५६१--२ लाख १७ हजार ४००

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे-- १५०-- ६९ हजार ८००

आवश्यक उपाययोजना न करणे--२४१ प्रतिष्ठाने --४ लाख ८० हजार ३००

उपाययोजना न करणारी वाहने--३७४--१ लाख ५५ हजार २००

सील केलेली प्रतिष्ठाने--२३

कारवाईत पोलिस आघाडीवर

जिल्हा पोलिस दलाने मास्क न वापरणाऱ्या १२ हजार ६०३ व्यक्तींकडून २६ लाख ८१ हजार २०० रुपयांचा, मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या ५३१ व्यक्तींकडून एक लाख ८१ हजार ९०० रुपये दंड वसूल केला. ५३१ व्यक्तींवर गुन्हेही दाखल केले. आवश्यक उपाययोजना न करणारे ३८ प्रतिष्ठानांकडून ६९ हजार दंड करून ३८ प्रतिष्ठानांवर गुन्हे दाखल केले.

मास्क न वापरणाऱ्यांकडून पावणेपाच लाखांचा दंड वसूल

महापालिका हद्दीत आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकासह इतर पथके कार्यरत आहेत. या पथकांनी मास्क न लावणाऱ्या एक हजार २५ व्यक्तींकडून चार लाख ८८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या आठ व्यक्तींकडून ३५ हजार रुपये, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या पाच व्यक्तींकडून दोन हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.