esakal | तक्रार निवारण समितीचे विद्यापीठाला वावडे

बोलून बातमी शोधा

jalgaon nmu
तक्रार निवारण समितीचे विद्यापीठाला वावडे
sakal_logo
By
टिम इ सकाळ

भुसावळ (जळगाव) : परीक्षांमधील गोंधळ, निकालास होणारा विलंब, पेपर पुनर्मूल्यांकनातील समस्या, शुल्क, प्रवेशापासून ते पदवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठातर्फे २०१८ मध्ये तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली. मात्र, या संदर्भात पोर्टल अद्ययावत करणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष झाल्याने तक्रारदार विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना विद्यापीठाच्या चकरा माराव्या लागत आहेत.

विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशापासून ते पदवीपर्यंत अनेक तक्रारींचा सामना करावा लागतो. यामध्ये विद्यार्थ्यांची हजेरी, शुल्क, प्रवेशपत्रिका, परीक्षांमध्ये होणारा गोंधळ, निकालाला होणारा विलंब, पेपर तपासणीतील चुका, पेपर पुनर्मूल्यांकन याचबरोबर निकालामधील चुका आदी समस्यांचा समावेश आहे. अशा प्रकारच्या तक्रारींसाठी विद्यापीठात तक्रार निवारण समितीकडे धाव घ्यावी लागते. मात्र, तक्रार दाखल केल्यानंतर कार्यवाही संदर्भात संकेतस्थळावर माहिती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.

विद्यपीठ ई-प्रशासनात विसंगतपणा

तक्रार निवारण समिती कार्यान्वित झाल्यापासून अद्यापही समितीची संपूर्ण रचना, कार्यप्रणाली, समितीत समाविष्ट सदस्य, दाखल तक्रारींची सद्यःस्थिती दर्शविणारा बोर्ड, झालेले निकाल आदी विषय संबंधितांच्या वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत. संकेतस्थळाची सुविधा उपलब्ध असूनही माहितीअभावी, आधीच त्रस्त झालेल्या तक्रारदार कर्मचाऱ्यास तक्रार निवारण समितीमध्ये तक्रार दाखल करतेवेळी वारंवार विद्यापीठात फेऱ्या माराव्या लागतात. ही बाब देशाच्या डिजिटल इंडिया, तसेच विद्यापीठाच्या ई-प्रशासन धोरणाशी पूर्णपणे विसंगत आहे.

या संदर्भात २ डिसेंबर २०२० ला अर्ज सादर केलेला आहे. तत्कालीन कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार यांनी विधी अधिकाऱ्यांना संकेतस्थळावर माहिती प्रकाशित करण्यासंबधी सूचना केल्याचे सांगितले होते; परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अधिसभा सदस्यांनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केलेल्या अर्जाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे.

-प्रा. एकनाथ नेहेते, सदस्य, अधिसभा तथा तक्रार निवारण समिती