esakal | सुर्यफुल तेलाच्या दरात शेंगदाणा तेल; दर सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर

बोलून बातमी शोधा

sunflowe oil

सुर्यफुल तेलाच्या दरात शेंगदाणा तेल; दर सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर

sakal_logo
By
टिम इ सकाळ

साकळी (ता. यावल) : एकीकडे इंधनाचे भावाने उच्चांक गाठलेला असताना दुसरीकडे जीवनावश्यक असलेल्या खाद्यतेलाचे भावही गगनाला भिडले आहेत. तेलाचे भाव महिनाभरात पंधरा ते वीस रुपयांनी वाढले असून, वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पुरते कोलमडले आहे. मुळात आतापर्यंत सर्वाधिक दर असलेल्‍या शेंगदाणाच्या बरोबरीत सुर्यफुल तेलाचे दर पोहचले आहेत.

गेल्या तीन-चार महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावाने उच्चांक गाठलेला असून, आता सोयाबीन तेल तब्बल दीडशे रुपये किलो मिळत आहे, तर होलसेलला जवळपास १४५ चा भाव आहे. एवढे महागाचे तेल घेणे सर्वसामान्य नागरिकांना परवडेनासे झालेले आहे. सध्या तर शेतमजुरांना मजुरीची कामे नसल्याने त्यांच्याकडे आर्थिक स्त्रोत नाही. त्यामुळे संसाराचा जेमतेम खर्च भागवित असताना एवढ्या महागाचे तेल खायचे कसे? असा प्रश्न सर्वसामान्य तसेच मजूरवर्गाला पडलेला आहे.

रडगाणे सोसवेना

महिला वर्गाला रोजच्या स्वयंपाकासाठी खाद्यतेलाची नितांत गरज असते. त्याशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही. तथापि गेल्या चार- पाच महिन्याअगोदर तेलाचे भाव शंभर रुपये किलोच्या आतच होते. मात्र, आता अचानक जवळपास दोन महिन्यांपासून तेलाने भावात एकदम मोठी वाढ झाल्याने महिलांना खाद्यतेलाअभावी स्वयंपाक करणे कठीण बनले आहे. स्वयंपाकगृहातील आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे.

खाद्यतेल विक्रेत्यांकडून लूट?

सध्या लॉकडाउन सुरू आहे. या कडक निर्बंधाचा फायदा घेत किरकोळ खाद्यतेल विक्रेते चढ्या दराने तेलाची विक्री करीत असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक लूट होऊ शकते, या बाबीकडे सुद्धा संबंधित प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडलेले असताना लोकप्रतिनिधी गप्प का? असा प्रश्‍न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.

दोन महिन्यात उच्चांकी वाढ

सुर्यफूल तेलाचा दर जानेवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात प्रतिकिलो १३४ दर होता. तर सध्या एक किलो सुर्यफुल तेलासाठी ग्राहकांना १८५ ते १९० रुपये मोजावे लागत आहे. हीच अवस्था शेंगदाणा तेलाची आहे. दोन महिन्यापूर्वी १६० रुपये प्रति किलो भावाने मिळणाऱ्या शेंगदाणा खाद्यतेलासाठी सध्या १८५ रुपये मोजावे लागत आहे. तर सोयाबीन तेलाच्या भावातही तब्बल १५ ते २५ रुपयांची वाढ आहे.

खाद्यतेल प्रतिकिलो आजचे दर

शेंगदाणा १८० ते १८५

सोयाबिन १५० ते १५५

सूर्यफुल १८५ ते १९०

करडई २१० ते २२०