esakal | रेमडेसिव्हिरच्या काळ्या बाजारातील ‘नेक्सस’

बोलून बातमी शोधा

remdesivir black market
रेमडेसिव्हिरच्या काळ्या बाजारातील ‘नेक्सस’
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : दोन-चार घटना उघडकीस आणून, त्यात गुन्हे दाखल करत दहा- बारा जणांना ताब्यात घेऊन रेमडेसिव्हिरचा काळा बाजार उठणार नाही.. हा बाजार उठवायचा असेल तर प्रशासन व पोलिस दलाला सर्व आर्थिक अन्‌ राजकीय दबाव झुगारून मेडिकल माफियांची ‘कॉलर’ धरावी लागेल..

मागणी आणि पुरवठ्यात तफावतीमुळे रेमडेसिव्हिरचा तुटवडा निर्माण झाला. तत्पूर्वी, म्हणजे साधारण महिन्याआधी काही संस्थांनी पुढाकार घेत या इंजेक्शनचे दर आठ- नऊशेपर्यंत प्रयत्नपूर्वक खाली आणले होते. हे जर ज्यावेळी खाली आले, त्यानंतर लगेचच त्याचा तुटवडा जाणवू लागला. हे असे का व्हावे? याचा विचार खरंतर पोलिस व प्रशासकीय यंत्रणेने करायला हवा. असो..

रेमडेसिव्हिरच्या उपलब्धतेची स्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे वितरण स्वत:च्या नियंत्रणात घेतले. मात्र, तोवर बराच उशीर झाला होता. मार्केटमध्ये होते- नव्हता तेवढा साठा ‘माफियां’च्या ताब्यात आला होता. आणि खरी ‘दुकानदारी’ इथनूच सुरू झाली.

मग नातलगांची सुरू होते तगमग

कोविड हॉस्पिटलशी संलग्न मेडिकललाच हे इंजेक्शन पुरविण्याचे आदेश निघाले. रेमडेसिव्हिर अंतिम किंवा एकमेव पर्याय नाही, आयसीएमआरचे दिशानिर्देश उद्‌धृत करून प्रशासनाने डॉक्टरांना त्याच्या वापराबाबत आवाहनही केले. मात्र, तरीही रुग्ण दाखल होताच ‘रेमडे’चे प्रीस्क्रीप्शन त्याच्या नातलगाच्या हाती देण्याची खासगी हॉस्पिटल्समध्ये स्पर्धा लागली. स्वाभाविकच ‘दुकानदारी’ करणाऱ्यांचे फावले. हाती कागद पडताच नातलगांनी तगमग, इंजेक्शनसाठी हॉस्पिटल परिसरातूनच फोनाफानी, धावपळ.. हे चित्र काळा बाजार मांडलेल्यांच्या दलालांसाठी सुखावह होते. कुठे न मिळणारे इंजेक्शन त्याच हॉस्पिटल परिसरात अथवा फोनद्वारे प्राप्त संपर्कातील दलालाकडून मिळू लागले.. हे दलाल कोण? तर समाजात वावरणारे स्वत:ला समाजसेवी म्हणविणारे प्रतिष्ठित चेहरेच आहेत.. बरेचजण, आणि प्रशासन व आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, व्यक्ती तर या चेहऱ्यांना नक्कीच ओळखता, पण त्या चेहऱ्यामागचा दलाल त्यांना ओळखायचा आहे.

बडे मासे सापडतील का?

काळ्या बाजारात पोलिसांनी माहितीच्या आधारे भुसावळ बाजारपेठ, जळगाव शहर ठाण्याच्या अंतर्गत तीन कारवायांना परिणाम दिला. तीन घटनांत १४ जणांवर गुन्हे, १२ अटकेत ही आकडेवारी पोलिस अधीक्षकांनी सार्वजनिक केली खरी, मात्र या मोहऱ्यांमागचा सूत्रधार पोलिसांच्या दृष्टिक्षेपात नाही. ज्यांना अटक झाली, त्यांच्या चौकशीतून या काळ्या बाजाराचं ‘नेक्सस’ उघड होईलही, पण ते ज्याठिकाणी संपेल त्या ठिकाणापर्यंतच्या प्रवासातील काही ‘बडे मासे’ व मुख्य सूत्रधाराला पोलिस अटक करु शकतील का? हा प्रश्‍न आहे.

खरेतर कोरोनाच्या या संकट काळात संपूर्ण विश्‍व त्याविरोधात अनेकांचे प्राण गमावूनही प्राणपणाने लढत असताना रुग्ण, त्यांच्या नातलगांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यातूनही ‘दुकानदारी’ करणारी मेडिकल माफिया प्रवृत्ती समाजात आहे, हेच या समाजाचे दुर्दैव.