esakal | जिल्हाधिकारी कोरोनात व्यस्त अन्‌ यंत्रणा ‘मस्त’; निराधार योजनेत अपहार

बोलून बातमी शोधा

sanjay gandhi niradhar yojana fraud
जिल्हाधिकारी कोरोनात व्यस्त अन्‌ यंत्रणा ‘मस्त’; निराधार योजनेत अपहार
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी कोरोनाविरोधात लढण्यात व्यस्त असल्याने खालच्या यंत्रणेचे फावत असून महसुलातील काही प्रवृत्ती या स्थितीचा फायदा घेत ‘हात धुवून’ घेताना दिसत आहे.

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींची रक्कम लिपिकाने त्याच्या नातलगाच्या नावे वर्ग केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर खालची यंत्रणा गैरव्यवहार करण्यात किती मश्‍गूल आहे, हे समोर आले आहे.

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींची सुमारे १४ लाखांची रक्कम लिपिकाने आपली पत्नी, शालकाच्या नावे बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर वर्ग केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून या यंत्रणेवर कुणाचेच नियंत्रण राहिले नाही का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटात जिल्हाधिकारी स्वत: फ्रंटलाइनवर लढत असून त्यांना अन्य अधिकारी तेवढ्याच सक्षमतेने साथ देत आहेत. मात्र, काही विभागात खालची यंत्रणा अत्यंत बरबटलेली दिसते. या यंत्रणेवर कुणाचा वचक राहिलेला नाही. अशी काही प्रकरणे समोर येत असून तक्रारीही येत आहेत.

अधिकाऱ्यांविना विभाग

जळगावसारख्या साडेपाच लाख लोकसंख्येचे शहर व उपविभागाला अद्याप प्रांताधिकारी नाही. तहसीलदारांचे पदही प्रभारी सांभाळताहेत. याआधीचे या पदांवरील अधिकारी अशाच गैरव्यवहाराच्या कारणांवरुन चर्चेत राहिले व ‘घरी’ गेले. आताही खालच्या यंत्रणेतील अगदी लॉकडाऊन असताना वाळूचोरी व अन्य प्रकरणांत ‘हात धुवून’ घेत आहेत. मात्र, त्यावर कुणाचा वचक नसल्याची स्थिती आहे.

महसूलमंत्र्यांकडूनही दखल नाही

महसूल विभागातील अनागोंदी, अधिकाऱ्यांची मनमानी, वाळूचोरीचा नेहमीच गंभीर स्थितीतील विषय आणि गैरव्यवहार अशी अनेक प्रकरणे व त्यासंबंधी तक्रारी होत असताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांकडूनही दखल घेतली जात नाही, याबद्दलही आश्‍चर्य व्यक्त होत आहे. महसूल खात्याचे मंत्रिपद स्वीकारल्यापासून थोरातांनी आजपर्यंत जळगावचा आढावा घेतलेला नाही, हे विशेष.