
बाधित शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीसाठी दहा हजार प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार प्रतिहेक्टर या दराने दोन हेक्टरची मर्यादित मदत देण्यात यावी.
जळगाव : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित नागरिकांना मदत देण्याविषयी शासनातर्फे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यात जळगाव जिल्ह्यासाठी एकूण १९ कोटी ५५ लाख १६ हजारांची मदत वितरित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ३६ हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे.
वाचा- जळगावात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पाचशेच्या आत -
राज्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी होऊन काही गावांत पूर आला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य शासनाकडून मदत देण्यास सोमवारी मान्यता देण्यात आली. यात शेतीचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीसाठी दहा हजार प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार प्रतिहेक्टर या दराने दोन हेक्टरची मर्यादित मदत देण्यात यावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे.
यानुसार नाशिक विभागाला २२६ कोटी ८९ लाख १९ हजार रुपये एवढी रक्कम वितरित करण्यात येणार आहे. यात जळगाव जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीत घरे क्षतिग्रस्त, मनुष्यहानी, जखमी असल्यास कपडे व घरगुती वस्तूंसाठी अर्थसहाय्य म्हणून २८ लाख, मृत जनावरांसाठी आठ लाख ३७ हजार, पूर्णतः नष्ट झालेली घरे, झोपड्या, गोठे यासाठी दहा लाख, सहा हजार, शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २८ लाख ६३ हजार, शेती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी यात ‘एसडीआरएफ’च्या दराने १२ कोटी ८१ लाख ९८ हजार, तर वाढीव दराने पाच कोटी ९८ लाख १२ हजार याप्रमाणे एकूण शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारी एकूण रक्कम १९ कोटी ५५ लाख १६ हजार अशी आहे. यात जिल्ह्यासाठी २६ कोटींची मागणी करण्यात आली होती.
संपादन- भूषण श्रीखंडे