पोलिस ठाण्यात ‘नो मास्क नो एन्ट्री’ !

अल्हाद जोशी
Wednesday, 14 October 2020

पोलिस ठाणे, तहसीलदार कार्यालय या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. कोरोना रोखण्यासाठी तोंडावर मास्क लावणे आवश्यक असल्यामुळे नागरिकांना सवय व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला.

 एरंडोल : शहरासह ग्रामीण भागात ‘कोरोना’ला रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. एरंडोल पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनीदेखील पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तोंडावर मास्क लावला नसेल तर पोलिस ठाण्यात प्रवेश नाही हा उपक्रम सुरू केला आहे. सहाय्यक निरीक्षक उनवणे यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. 

वाचा- कापूस नोंदणी थांबल्याने शेतकरी रस्त्यावर 
 

शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रशासनाने अनेक उपाययोजना राबवून, तसेच कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केल्यामुळे तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक उनवणे यांनी पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच ‘नो मास्क नो एन्ट्री’ असा फलक लावला आहे. पोलिस ठाणे, तहसीलदार कार्यालय या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. कोरोना रोखण्यासाठी तोंडावर मास्क लावणे आवश्यक असल्यामुळे नागरिकांना सवय व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

 

वाहतूक शाखेचे विकास खैरनार, विलास पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांनी धरणगाव चौफुली, म्हसावद नाका परिसर या ठिकाणी विनामास्क लावून मोटारसायकल चालविणाऱ्या ३५० चालकांविरुद्ध कारवाई करून सुमारे सत्तर हजार रुपयांचा दंड वसूल केला. शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलिस कर्मचारी गस्त घालत असून, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना समज देऊन कारवाई करीत आहेत. पोलिसांनी मास्क न लावता वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात केल्यामुळे वाहनचालक मास्क लावून फिरत आहेत. पोलिसांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. पोलिस व गृहरक्षक दलाचे जवान विविध उपक्रम राबवून कोरोनाबाबत जनजागृती करीत आहेत. प्रत्येक वाहनचालकाने तोंडावर मास्क लावूनच वाहन चालवावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी केले आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon no one can enter the Erandol police station without wearing a mask to prevent corona infection