घरकुल घोटाळा : अपात्रता प्रकरणी न्यायालयाची पाच  नगरसेवकांसह आयुक्तांना नोटीस 

देविदास वाणी
Saturday, 7 November 2020

पाचही नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी मंत्रायलयात राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडे एका तक्रारीद्वारे केली होती. 

जळगाव ः येथील बहुचर्चीत घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या विद्यमान पाच नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भात १६ मार्च २०२० रोजी न्यायालयात विशेष दावा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने आज पाचही नगरसेवकांसह महापालिका आयुक्तांनाही नोटीस बजावत आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी दावा दाखल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता हे पाठपुरावा करत आहेत. 

आवश्य वाचा- पक्ष प्रवेशा वेळी पवार साहेबांकडून मी शब्द घेतला आहे, अपूर्ण राहिलेल्या योजना पूर्ण करण्याचा- खडसे 

घरकुल घोटाळ्यात आजी-माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसह ४८ जणांना धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यामध्ये नगरसेवक भगत बालाणी, नगरसेवक सदाशिव ढेकळे, नगरसेवक दत्तात्रय कोळी, नगरसेवक लता भोईटे, नगरसेवक कैलास सोनवणे यांचा समावेश आहे. दरम्यान, पाचही नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी मंत्रायलयात राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडे एका तक्रारीद्वारे केली होती. 

डिसेंबर २०१९ मध्ये दोषी पाचही नगरसेवकांना अपात्र का करण्यात येवू?, हा जाब विचारत महापालिका आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. १७ डिसेंबर रोजी सर्व नगरसेवकांना सुनावणीसाठी हजर राहण्याचेही आदेश दिले होते. त्यानंतर याप्रकरणात आपल्याला कारवाईचा अधिकार नसल्याचे आयुक्तांनी म्हटले होते. 

वाचा- खडसेंचा दणका सुरूच ; हजारो भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ! 

पाच दिवसांनी पून्हा होणार सुनावणी

आज न्यायाधिश जे.जी. पवार यांच्या कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने याप्रकरणी आज न्यायालयाने पाचही नगरसेवकांना नोटीस बजावत आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पाच दिवसांनी पुन्हा सुनावणी होणार आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon notice to the commissioner along with five corporators disqualification case