मला फडणवीसांंनी त्रास दिलाय, मी मुळीच स्वस्थ बसणार नाही !

सचिन जोशी
Thursday, 10 September 2020

‘जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज करण्यात आले, त्याप्रसंगी खडसेंनी पुन्हा आपल्या भावनांना वाट मोकळी करुन फडणवीसांबद्दलची रोष पून्हा दिसून आला. 

जळगाव: मला पक्षाकडून कधीच त्रास झाला नाही त्यामुळे पक्षाबद्दल मी कधीही बोललो नाही. पण मी अन्याय सहन करणाऱयांमधला नसून मी स्वस्थ बसणार नाही, फडणवीसांनी मला त्रास दिलाय मग त्यांच्याबद्दल तर बोलत राहील, आणि त्यांना जाब देखील विचारणार, अशी टीकेची तोफ माजीमंत्री एकनाथराव खडसेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर डागली आहे. 

प्रा. सुनील नेवे लिखित ‘जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज करण्यात आले, त्याप्रसंगी खडसेंनी पुन्हा आपल्या भावनांना वाट मोकळी करुन फडणवीसांबद्दलची रोष पून्हा दिसून आला. 

या भागावर अन्यायच 
उत्तर महाराष्ट्रावर सुरवातीपासूनच अन्याय झालांय. जेव्हा इथला नेता मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत गेला, त्याला नेहमी डावलण्यात आले असे सांगाताना खडसेंनी रोहिदास पाटील, मधुकरराव चौधरी यांची उदाहरणे दिली. मला डावललं, माझं काही बिघडलं नाही. मात्र या भागातील सर्व प्रकल्प, विकासकामे थांबली. या भागाचं नुकसान केलं, असा आरोप त्यांनी केला. 

फडणवीसांवर रोष 
मी आजपर्यंत पक्षाबद्दल बोललेलो नाही, बोलणारही नाही. मात्र, ज्यांनी त्रास झाला, ज्यांनी षडयंत्र रचलं, त्या फडणवीसांबद्दल बोलेल, त्यांना जाब विचारेलच. गेल्या निवडणुकीत अनेकांची तिकिटे कापली, काहींना पाडण्याचे कारस्थान केले, त्यामुळेच सत्ता येऊ शकली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

दुसऱ्या पुस्तकाची प्रतीक्षा करा 
२०१४मध्ये सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे एकट्याच्या बळावर १२३ आमदार निवडून आणले. मुख्यमंत्रिपद मिळाले नाही, त्याचे दु:ख नाही. पण त्यानंतर माझ्यासोबत ज्या घटना घडल्या त्या क्लेशदायी आहेत. हे कुणी केलं, का केलं हे सर्व माहीत आहे. आपल्या मनात जे आहे, ते या पुस्तकात नाही. पण, या कृत्यांबाबत ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लिहीत असून ते लवकरच सादर करु, त्याची प्रतीक्षा करा, असे खडसे म्हणाले. 

प्रफुल लोढांकडील क्लीपचा उल्लेख 
मी काही केलेले नसताना मला राजीनामा द्यावा लागला. मात्र, पक्षातील काहींचे किस्से गंभीर आहेत. अनेकजण मला विचारताय की, ‘भाऊ कोणती क्लीप आहे तुमच्याकडे, कोणत्या मंत्र्याची, पी.ए.ची आहे? करा व्हायरल..’ असेही सांगतांय. त्यावर त्यांना आपण ‘जा त्या जामनेरच्या प्रफुल लोढांकडे.. विचारा त्यांना’ असे सांगत असून ही क्लीप सार्वजनिक करण्याच्या खालच्या पातळीपर्यंत मी जाणार नाही, असे ते म्हणाले. 

नाथाभाऊंमुळेच आमदार : राजूमामा 
यावेळी जळगाव शहराचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. औरंगाबादहून येताना ब्रिटीशकालीन इतिहास नाथाभाऊंनी पूर्ण सांगितल्याचा अनुभव भोळेंनी मांडला. अनेक कार्यकर्ते त्यांनी घडविले, नाथाभाऊंमुळेच आपण आमदार आहोत, असेही राजूमामा म्हणाले. माजी आमदार चैनसुख संचेती, महामंडलेश्‍वर पू. जनार्दनहरी महाराज, पू. भक्तीप्रकाशदास, पू. प्रभाकरशास्त्री आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, खासदार रक्षा खडसे, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे- खेवलकर, दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, व मान्यवर उपस्थित होते. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon occasion of the publication of Eknathrao Khadse's book, Khadse again verbally criticized Fadnavis