
केकेआर’ विरुद्ध 'सीएसके' या आयपीएल क्रिकेट मॅच सुरू असताना मोबाईलवर ऑनलाइन सट्टा घेत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना मिळाली.
जळगाव : पंधरा दिवसांपासून आयपीएल क्रिकेट मॅच सुरू आहेत. यात केकेआर विरूद्ध सीएसके यांच्यात सुरू असलेल्या मॅचमध्ये फटकेबाजी सुरू होती. या फटकेबाजीवर मात्र ऑनलाइन सट्टा चालविला जात होता. चेन्नई पे कितना..असे म्हणताच पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली आहे.
शिव कॉलनी परिसरातील गंगासागर अपार्टमेंटच्या तळ घरात योगेश महाजन यांच्या घरात ‘केकेआर’ विरुद्ध 'सीएसके' या आयपीएल क्रिकेट मॅच सुरू असताना मोबाईलवर ऑनलाइन सट्टा घेत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, उपनिरीक्षक अंगद नेमाने, विजयसिंह पाटील, अनिल जाधव, गोरखनाथ पाटील, महेश महाजन दत्तात्रेय बडगुजर, राहुल पाटील, अविनाश देवरे, सविता परदेसी, रमेश जाधव यांचे पथक रवाना केले.
एक लाखापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त
योगेश प्रदीप महाजन (वय 26, रा. गंगासागर अपार्टमेंट शिव कॉलनी) व राजेंद्र शिवराम पाटील(वय 39, रा.गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री नऊ वाजता शिव कॉलनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून टीव्ही, सेट टॉप बॉक्स, रिमोट, पेन ड्राइव्ह, लॅपटॉप व 10 मोबाईल असा एक लाख 27 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान ‘आयपीएल'वर सट्टा जळगावात कारवाई झाली आहे. त्यामुळे मीटिंगमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
'चेन्नई पे कितने' म्हणताच धाड..
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री नऊ वाजता गंगासागर इमारतीला घेरून योगेश महाजन यांच्या घराच्या बाहेर दबा धरला.
टीव्हीवर मॅच सुरू असताना काही जण मोबाईलवर रकमेचा उल्लेख करून,, 'चेन्नई पे कितने', 'केकेआर पर कितने, असे जोरात बोलत होते.यावरून सट्टा घेत असल्याची खात्री पटताच पोलीस पथकाने धाड टाकून योगेश महाजन, राजेंद्र पाटील यांना दोघांना रंगेहात पकडले. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी हवालदार विजयसिंह धनसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.