ऑनलाइन व्यापाऱ्याला गंडवले...पडद्यांची ऑर्डर देत माल, खात्यातून पैसेही लंपास 

रईस शेख
Tuesday, 4 August 2020

घरातील पडद्यांसाठी विचारणा करून व्हॉट्सॲपवर डिझाइन पाठवण्याची विनंती केली. डिझाइन सिलेक्ट झाल्यावर त्याने पडदे तयार करण्याची ऑर्डरही दिली.

जळगाव  : शहरातील संत कंवराम मार्केटमधील व्यापाऱ्याकडून घरातील पडद्यांची ऑर्डर देऊन ते तयार करून घेतले आणि ऑनलाइन पैसे देण्याचा बहाणा करून उलट २७ हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. 

गायत्रीनगरमधील प्रमोद कावना (वय ४०) यांचे ‘श्री साईबाबा एजन्सीज’ या नावाने हॅन्डूम दुकान आहे. २१ ऑगस्टला दुपारी कावना यांना ७६६२८६६८२५ या क्रमांकाच्या मोबाईलवरून श्रीधर यादव नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने घरातील पडद्यांसाठी विचारणा करून व्हॉट्सॲपवर डिझाइन पाठवण्याची विनंती केली. डिझाइन सिलेक्ट झाल्यावर त्याने पडदे तयार करण्याची ऑर्डरही दिली. सांगितल्याप्रमाणे कावना यांनी पडदे तयार करून ठेवले होते.

शुक्रवारी (ता.३१) श्रीधर यादव नावाच्या व्यक्तीने पडदे घेण्यासाठी एका व्यक्तीला दुकानावर पाठवले. बोलणे झाल्यावर ‘तुमचा गुगल-पे नंबर द्या, मी ऑनलाइन पेमेंट करतो’, असे म्हटल्यावर कावना यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक दिला. संबंधित व्यक्तीने क्यूआर कोड पाठवला. त्या आधारे कावना यांच्या खात्यातून त्याने पाच रुपये काढले व लगेच दहा रुपये जमा केले. नंतर चक्क पाच हजार विड्रॉल झाल्याने कावना यांनी दूरध्वनी करून चौकशी केल्यावर यादव नावाच्या व्यक्तीने तुम्हाला आलेला ओटीपी सांगा लगेच पैसे डिपॉझिट होतील, असे सांगितल्यावर काही वेळातच त्याने पुन्हा २२ हजार रुपये खात्यातून लंपास केले. घडलेल्या प्रकारानंतर कावना यांनी दूरध्वनी केल्यावर संबंधिताने तो कट केला. याबाबत सोमवारी प्रमोद कावना यांनी शहर पेालिस ठाण्यात तक्रार दिली. 

क्यूआर कोड स्कॅनिंग नकोच... 
ऑनलाइन व्यवहाराच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. मोबाईल-पेद्वारे पैशांची देवाणघेवाण करताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत असून, कुठल्याही व्यवहारादरम्यान पैसे घ्याचे असताना संबंधिताने पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन करण्याची जोखीम घेऊ नये; अन्यथा खात्यातून पूर्ण रक्कम सायबर गुन्हेगार लंपास करतात. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon online merchant was robary ordering curtains, goods, money from the account