जळगावात काँग्रेससमोर संधी अन्‌ अस्तित्वाला धोक्याचीही शक्यता !

सचिन जोशी
Saturday, 31 October 2020

जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचे असित्व मर्यादित आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीची बाजू आक्रमकपणे प्रदेश कमिटीकडे मांडेल, असा दमदार नेता त्यांच्याकडे नाही. निवडणुकीच्या वेळी नेहमी या घटकाची उणीव स्थानिक काँग्रेसला भासते.

जळगावः येणाऱ्या काळातील राजकीय समीकरणे काय असतील, हे आताच सांगणे कठीण असले तरी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी कायम राहील, असे गृहित धरले तर राष्ट्रवादीचे नेतृत्व आता एकनाथ खडसेंकडे आल्याने मित्रपक्षातील या नेतृत्वाचा स्वत:साठी लाभ करून घेण्याच्या संधीचा काँग्रेस कसा लाभ घेते, हे पाहावे लागेल. अर्थात, राष्ट्रवादीच्या विस्तारात मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या जिल्ह्यात राहिलेल्या अस्तित्वालाही धोका पोचू शकतो, याबाबतही काँग्रेसजनांना सजग राहावे लागेल. 

आवश्य वाचा- रूग्‍ण घटले तरी ॲन्टिजेन किटचा तुटवडा; संपर्कातील व्यक्तींच्या टेस्टिंग नाहीच 
 

साडेतीन दशकांपासून खडसेंनी ज्या पक्षांविरोधात संघर्ष केला त्यापैकी एका पक्षात त्यांचा नुकताच प्रवेश झाला. त्यांच्या या पक्षांतराचे राजकीय वर्तुळातील पडसाद स्वाभाविक आहे. एकमेव आमदार (शिरीष चौधरी, रावेर) व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मर्यादित अस्तित्व असलेल्या काँग्रेसमधूनही या राजकीय अंकाची प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. काँग्रेसजनांनी खडसेंच्या आघाडी सरकारच्या मित्रपक्षातील प्रवेशाचे स्वागत केले असले तरी ते मनापासून केले नसेल, याबद्दल कुणाच्या मनात शंका नसावी. सरकारमध्ये मित्रपक्ष म्हणून काँग्रेसला ‘स्वागत’ करावे लागले किंबहुना दाखवावे लागले. 

भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही खरेतर राष्ट्रीय पक्ष. राष्ट्रीय असले तरी या दोन्ही पक्षांना प्रांतीय राजकारणातही रस घ्यावा लागला. गेल्या काही वर्षांत तर हे दोन्ही पक्ष त्यांच्या विचारांच्या प्रादेशिक मित्रपक्षांच्या सोबतीने राज्यात स्थिरावले, वाढले, सत्ताधीशीही बनले. त्यामुळे भाजप व शिवसेनेची युती जशी विचारातून जन्माला आली व २५ वर्षे टिकली. तशी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही विचार व अपरिहार्यतेतून जन्मली आणि राज्यात पंधरा वर्षे टिकली. त्यामुळे या दोन्ही पक्षांतील अंतर्गत बदलांचा परस्परांवरही तेवढाच परिणाम होत असतो. 

एकतर जिल्ह्यात काँग्रेसचे असित्व मर्यादित आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीची बाजू आक्रमकपणे प्रदेश कमिटीकडे मांडेल, असा दमदार नेता त्यांच्याकडे नाही. निवडणुकीच्या वेळी नेहमी या घटकाची उणीव स्थानिक काँग्रेसला भासते. प्रदेश कमिटीलाही त्याची जाणीव आहे; परंतु अनेकदा जिल्ह्याला ‘पालक’ देऊनही केवळ पोषण आहार न मिळाल्याने काँग्रेस कुपोषित राहिली, हेदेखील नाकारून चालणार नाही. 

स्वाभाविकत: खडसेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश भाजपसाठी जसा डोकेदुखी ठरू शकतो, तसा तो काँग्रेससाठी म्हटले तर फायद्याचा अन्यथा तोट्याचाही ठरू शकतो. कारण, खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला आणि त्यांचे मुख्य लक्ष्य भाजप असले तरी त्यांना त्यांचे राष्ट्रवादीतील स्थान बळकट करून पुन्हा एकदा जिल्ह्याचे नेतृत्व काबीज करण्यासाठी ते ज्या पक्षात आहे, त्या पक्षाचा विस्तार जोमाने करावाच लागेल. त्यात भाजप, सेनेसोबत कदाचित काँग्रेसही प्रभावित होऊ शकते. 

वाचा- शेतीच्‍या पोटहिस्‍याचा स्‍वतंत्र सातबारा

दुसरीकडे, राष्ट्रवादी मित्रपक्ष असल्याने या पक्षाकडे दमदार नेतृत्व आल्यामुळे या नेतृत्वाचा स्वत:च्या पक्षासाठीही लाभ करून घेण्याची संधी काँग्रेससमोर आहे. अर्थात, त्यासाठी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. मात्र, त्या निवडणुकीच्या मैदानासाठी आतपासूनच ‘खेळपट्टी’ तयार करण्याच्या दृष्टीने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना खडसेंशी जमवून घ्यावे लागेल. ही खेळी काँग्रेसला जमली नाही तर पुढे निवडणुकीदरम्यान जागा वाटपाच्या तहात काँग्रेस सर्वकाही गमावून बसते, हाच नेहमीचा अनुभव आहे आणि आता तर मित्रपक्षाकडे खडसेंसारखा लढवय्या असल्याने हा धोका अधिक आहे. काँग्रेसला याबाबत सजगच राहावे लागेल.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon opportunity in front of congress in jalgaon district and possibility of threat to existence