एसटीची मालवाहतूक चालकांसाठी जाचकच; रिटर्न ट्रिपसाठी मुक्‍काम 

malvahtuk parivahan bus
malvahtuk parivahan bus

जळगाव : कोरोनाचा काळ साऱ्यांसाठी संकटकाळ ठरला आहे. यात राज्‍य परिवहन महामंडळासाठी तीन- चार महिने विना उत्‍पन्नाचा राहिला. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देखील थकले आहेत. उत्‍पन्नाचा स्‍त्रोत सुरू करण्यासाठी एसटीने मालवाहतूक सेवा सुरू केली. पण महामंडळाला उत्‍पन्न देणारी मालवाहतूक सेवा चालकांसाठी एकप्रकारे जाचकच ठरत आहे. कोरोनाचा काळ असताना देखील लागलीच परत न येता जाईल त्या ठिकाणी मुक्‍कामी राहण्याची सक्‍ती चालकांना करण्यात येत आहे. 

राज्‍य परिवहन महामंडळाच्या बस लॉकडाउनच्या काळात स्थानकातच उभ्‍याच राहिल्‍या. यामुळे २२ मार्चपासून मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महामंडळाचे उत्‍पन्न शून्य राहिले. यावर तोडगा म्‍हणून महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरू करत उत्‍पन्नाचे साधन सुरू केले. सध्याच्या अनलॉकच्या काळात प्रवासी वाहतुकीला सुरवात झाल्‍यानंतर एक पर्याय म्‍हणून मालवाहतूक सेवा सुरूच ठेवली आहे. यामुळे निश्‍चित महामंडळाच्या उत्‍पन्नात भर पडणारी आहे. पण, कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरू नये इतकेच. एसटी कर्मचारी हे कोरोनाच्या काळात देखील आनंदाने सेवा बजावत असले, तरी महामंडळाने कठोर निर्णय कर्मचाऱ्यांसाठी जिव्हारी आणणारे ठरायला नकोत. 

जेवणासाठी बाहेरचा पर्याय 
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यामुळे समोरच्या व्यक्‍तीवर देखील विश्‍वास ठेवणे सध्याच्या काळात प्रत्येकालाच अशक्य वाटत आहे. अशा परिस्‍थितीत एसटी महामंडळाच्या चालकांना मालवाहतुकीची ट्रिप नेल्‍यानंतर रिटर्न ट्रिप मिळेपर्यंत मुक्‍कामी रहावे लागत आहे. अर्थात ट्रिप मिळण्यास चार- पाच दिवसांचा कालावधी देखील लागतो. यात बाहेर कोरोनाची भिती असताना चालकांना बाहेरच्या जेवणावर अवलंबून रहावे लागत आहे. यामुळे त्‍यांच्या आरोग्य सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. 
 
रिकामे आले, तर पगारातून कपात 
कोणत्‍याही ठिकाणची मालवाहतूक ट्रिप मिळाल्‍यास ती घेतली जाते. अर्थात जळगावातून अकोला ट्रिप मिळाल्‍यास ती नेली जाते. मात्र, अकोल्‍याहून रिटर्न ट्रिप मिळाल्‍याशिवाय चालकाला गाडी परत न आणण्याची सक्‍ती करण्यात आली आहे. रिकामी बस आणली तर त्‍यासाठी लागणारा खर्च संबंधित कर्मचाऱ्याच्या पगारातून कपात करण्याचा सुलतानी तोंडी फतवा विभागाकडून काढण्यात आला आहे. हा फतवा मागे घ्यावा, अशी चालकांची मागणी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com