esakal | लालपरी होणार ‘पॅक’; ग्रामीण भागाबाबत अजूनही अनिश्‍चितता
sakal

बोलून बातमी शोधा

parivahan bus

गुजरात व कर्नाटक राज्‍य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू करण्यास परवानगी दिली. याच धर्तीवर महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाने प्रवासी वाहतुक करण्याबाबत नवीन आदेश काढून बसमधून पुर्ण आसनक्षमतेने प्रवासी वाहतुक करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

लालपरी होणार ‘पॅक’; ग्रामीण भागाबाबत अजूनही अनिश्‍चितता

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : ग्रामीण भागाच्या जीवनवाहीनी असलेल्‍या ‘लालपरी’ची रूतलेली चाके आता धावू लागली आहे. आतापर्यंत अपुर्ण क्षमतेने धावणाऱ्या बसमधून आता पुर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्‍य परिवहन महामंडळाकडून याबाबतचे आदेश काढले असून, राज्‍यात उद्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 
कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरवात झाल्‍यानंतर रस्‍त्‍यावरून धावणारी एसटी जागेवरच थांबवावी लागली होती. तेव्हापासून थांबलेली चाके तब्‍बल पाच महिन्यापर्यंत थांबलेली राहिली. गावात नव्हे तर रस्‍त्‍यावरून लाल रंगाची बस दिसेनाशी झाली होती. अर्थात कोरोनाच्या लॉकडाउन काळात रस्‍त्‍यावरून एक देखील वाहन दिसत नव्हते. एसटी उभी राहिल्‍याने महामंडळाला कोणत्‍याही प्रकारे उत्‍पन्न नाही. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्‍न देखील निर्माण झाला होता. यामुळे तीन महिन्यानंतर बससेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र त्‍यास प्रतिसाद न मिळाल्‍याने प्रवासी वाहतुक थांबवून मालवाहतुकीस सुरवात केली होती. यामुळे काही प्रमाणात उत्‍पन्न मिळू लागले होते. 

गुजरात, कर्नाटक राज्‍याचा अवलंब 
कोरोनामुळे सार्वजनिक प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी नव्हती. आता कोरोना वाढत असला तरी कंपनी, उद्योग याशिवाय मार्केट, दुकाने सुरू झाल्‍याने नागरीकांचे येणे- जाणे सुरू झाले आहे. यामुळेच आता गुजरात व कर्नाटक राज्‍य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू करण्यास परवानगी दिली. याच धर्तीवर महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाने प्रवासी वाहतुक करण्याबाबत नवीन आदेश काढून बसमधून पुर्ण आसनक्षमतेने प्रवासी वाहतुक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परिवहन महामंडळाचे महाव्यवस्‍थापक (वाहतुक) यांनी राज्‍यातील सर्व विभाग प्रमुखांना याबाबतचे आदेश पत्र काढले आहे. 

ग्रामीण फेऱ्यांबाबत अजूनही अनिश्‍चितता 
राज्‍य परिवहन महामंडळाने प्रवासी वाहतुक करण्यास २० ऑगस्‍टला परवानगी देत बसमधून केवळ ५० टक्‍के म्‍हणजे २२ प्रवाशांना घेवून वाहतुक करण्यास परवानगी दिली. यातून बसफेरीत लागणाऱ्या डिझेलचा खर्च देखील निघणे कठीण जात होते. मात्र आता बसमधून शंभर टक्‍के आसनक्षमतेने वाहतुक करण्यास परवानगी दिली आहे. ही परवानगी केवळ लांब व मध्यम लांब पल्‍ल्‍याच्या फेऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील फेऱ्यांबाबत अजूनही स्‍पष्‍ट निर्णय नाही. शंभर टक्‍के प्रवासी वाहतुक करताना प्रवाशांना मास्‍क बंधनकारक आहे. तसेच बस व प्रत्‍येक सीट सॅनिटाईझ करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. 

बसफेऱ्या पुर्ण आसनक्षमतेने सुरू करण्याबाबत आदेश आले आहेत. त्‍यानुसार अंमबजावणी करण्याचे शेड्युल विभागासाठी तयार केले जाईल. मात्र ग्रामीण भागातील फेऱ्यांबाबत स्‍पष्‍ट निर्णय नाही. 

- राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, रा.प.म. जळगाव.

loading image