पोलिस ठाण्याशेजारीच पूल पार्टीचा धिंगाणा 

रईस शेख
Monday, 23 November 2020

पोलिस हाॅटेलमध्ये जावून पाहणी केली असता हॉटेलमधील मोकळ्या जागेवरील स्वीमिंग पुलाच्या चहूबाजूला रंगीत पार्टी सुरू असल्याचे दिसली.

जळगाव : औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या भिंतीलगत असलेल्या हॉटेलमध्ये विनापरवानगी डी. जे. वाजवत पूल पार्टीचे आयेाजन करण्यात आले होते. पार्टी ऐन रंगात येण्याच्या वेळेस साध्या वेशातील पोलिसांनी पार्टीत शिरकाव केला. संपूर्ण पार्टी कॅमेराबद्ध (शूटआउट) केल्यावर पार्टीतील वाद्यवादक, नृत्यांगना, हॉटेल मालक, मॅनेजर आणि सहभागी रईसजाद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

आवश्य वाचा- लाडली नावाचं गाव; येथील भेंडी फॉरेनचीही ‘लाडली’
 

एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत पोलिस ठाण्याच्या शेजारी असलेल्या हॉटेल बाहेर वाहनांची असलेली प्रचंड गर्दी आणि कानठळ्या बसविणारा आवाज पाहता सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक संदीप पाटील, विशाल सोनवणे आदींनी साध्या वेशात हॉटेलमध्ये शिरण्याचा निर्णय घेतला. सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, जितेंद्र राठोड, किशोर पाटील आदींनी एका मागून एक आत शिरत हॉटेलमधील मोकळ्या जागेवरील स्वीमिंग पुलाच्या चहूबाजूला रंगीत पार्टी सुरू असल्याचे दिसले. त्यात डी.जे.चा सेट, गायक कलावंत सोबतच नृत्य करणाऱ्यांचा एक गट आणि जेवणासह इतर शानशौकतीची सोय या ठिकाणी करण्यात आली असल्याचे पाहत पोलिस पथकाने ते आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करीत संबंधितांना आपण कोण आहोत, याची ओळख करून दिली. 

पंचासमक्ष ओळखपरेड 
पोलिस अधिकाऱ्यांनी हॉटेल मॅनेजर याला विचारणा केल्यावर त्याने पूल पार्टी आयोजित केल्याचे सांगितले. हॉटेलमध्येच कार्यक्रम असल्याने परवानगीची गरज नसल्याचा युक्तिवाद केला. वाद्यवादक किशोर नागराज पाटील ऊर्फ डी.जे. शिवा याला बोलावून चौकशी केली असता, त्याच्याकडेही वाद्य वाजविण्याची परवानगी नसल्याचे आढळून आले. हा सर्व घटनाक्रम पोलिसांनी पंचासमक्ष नोंदविले. 

मालकासह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल 
हॉटेलचे मालक, मॅनेजरवर जिल्‍हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून कोरोना हा संसर्गजन्य रोग पसरविण्याचा संभव असताना कुठलीही विशेष काळजी किंवा नियोजन न करता लोकांची गर्दी गोळा करून विनामास्क सामाजिक अंतर न पाळता आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रण अधिनियमाचे उल्लंघन केले म्हणून पोलिस कर्मचारी किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रण अधिनियमाचे उल्लंघन कलम १८८, २५९ अन्वये गुन्हा दाखल केला. 
 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon party by violating the rules in the hotel next to the police station