वडीलांचे ते शब्द भिडले हृदयाला; मग काय घर सोडले आणि रसवंतीवर करू लागला काम   

रईस शेख
Thursday, 26 November 2020

जळगावला आल्यावर खाण्या पिण्यासाठी पैसे नसल्याने निर्वेदने एका रसवंतीवरही त्याने एक-दोन दिवस काम केले. मात्र, त्याच्या मागावर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने सलग तीन दिवस निम्मे शहर पिंजून काढले,

जळगाव : पुणे येथील प्रसिद्ध सराफाच्या मुलाने तीन दिवस घर सोडून पलायन केले होते. अवघ्या १७ वर्षांच्या युवकाने घर सोडून निघाल्याने कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली होती. ‘मी... मरेस्तव माझ्याशी बोलू नकोस’ हा एकच शब्द हृदयात टोचल्याने आपण घर सोडल्याचे या मुलाने सांगितले. 

पुणे येथील निर्वेद महेंद्र ओसवाल असे या युवकाचे नाव असून, त्याच्या वडिलांचे भोर (पुणे) येथे सराफा दुकान आहे. वाणिज्य शाखेचा अभ्यास करणारा हा युवक अल्पावधीतच सराफा व्यवसाय अत्मसात करून दुकान सांभाळत होता. मात्र, वडिलांचे आणि त्याचे नेहमीच खटके उडत. यात वडिलांनी रागवण्यात जे शब्द वापरले ते हृदयात खोलपर्यंत टोचल्याने काहीही विचार न करता त्याने घर सोडून जळगाव गाठल्याचे सांगितले.

रसवंतीवर केले त्याने काम

जळगावला आल्यावर खाण्या पिण्यासाठी पैसे नसल्याने निर्वेदने एका रसवंतीवरही त्याने एक-दोन दिवस काम केले. मात्र, त्याच्या मागावर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने सलग तीन दिवस निम्मे शहर पिंजून काढत त्याला सुखरूप शोधून काढत कुटुंबीयांच्या हवाली केले. 
 

पोलिसांची शोध मोहिम

पुणे येथील युवक जळगावात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती मिळाल्यावर त्यांच्या पथकातील संजय हिवरकर, राजेश मेंढे, नरेंद्र वारुळे, महेंद्र पाटील यांच्यासह पथकाने तब्बल तीन दिवस या मुलाचा शहरात शोध घेत होती. बुधवारी दुपारी त्याला यशस्वीरीत्या ताब्यात घेतले. नंतर कुटंबाला पोलिसांनी संपर्क केल्यावर त्याच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.

 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Police have arrested a young man from pune who left home in a quarrel between father and son