
लोनविषयी माहिती देऊन जीएसटी व प्रोसेसिंग फी ऑनलाइन भरण्याची माहिती देत महाले जिल्ह्यात विविध ठिकाणचे ग्राहक गोळा करत होते.
जळगाव : उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील शुभलक्ष्मी कंपनीने शहरात एजंट नेमून त्याच्या माध्यमातून पैसे गोळा करून कर्ज देण्याचे आमिष दाखवत जिल्हाभरातील विविध ठिकाणच्या १४ जणांची दोन लाख ८१ हजार ४५८ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. ४) समोर आला.
एप्रिल महिन्यात घडलेल्या या प्रकाराबाबत खंडेराव महाले (वय २९ रा. हरिविठ्ठलनगर) या एजंटाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
मार्च महिन्यात खंडेराव महाले यांची शुभ जनलक्ष्मी नोएडा कंपनीत जिल्ह्याचे एजंट म्हणून नियुक्ती झाली. ग्राहक गोळा करून लोनविषयी माहिती देऊन जीएसटी व प्रोसेसिंग फी ऑनलाइन भरण्याची माहिती देत महाले जिल्ह्यात विविध ठिकाणचे ग्राहक गोळा करत होते. अशा प्रकारे महाले यांनी कर्ज देण्याच्या नावाखाली एप्रिल महिन्यात शहरातील रामेश्वर कॉलनी, असोदा रोड, सिंधी कॉलनी, समतानगर, रामनगर याबरोबरच तालुक्यातील ममुराबाद, धरणगाव तालुक्यातील पथराड या ठिकाणचे १४ ग्राहक जमविले. यात, प्रत्येकाकडून आवश्यक कर्जाप्रमाणे जीएसटी व प्रोसेसिंग ऑनलाइन भरण्यात सांगितली. याप्रमाणे महाले यांनी विविध ठिकाणाहून शुभ जनलक्ष्मी कंपनीच्या बँक खात्यावर १४ ग्राहकांचे एकूण दोन लाख ८१ हजार ४५८ रुपये जमा केले. भरलेल्या रकमेविषयी संबंधित ग्राहक महाले यांच्याकडे तगादा लावत होते. त्यानुसार महाले कंपनीचे व्यवस्थापक दीपक चव्हाण, मानसी शर्मा यांच्यासह एका जणाला संपर्क साधत होते. मात्र विचारपूस केली असता, महाले यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत होती.
एजंट झाले फिर्यादी
महाले यांच्यासह ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यानुसार या प्रकरणी शुक्रवारी या प्रकरणी एजंट खंडेराव महाले यांच्या फिर्यादीवरून शुभ जनलक्ष्मीचा व्यवस्थापक दीपक चव्हाण, मानसी शर्मा, अनिल (पूर्ण नाव माहीत नाही) या तिघांविरोधात रामानंदनगर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.
संपादन ः राजेश सोनवणे