बंदूक लावून कारागृहातून फरार मगरे पुन्हा गवसला; पहुर पोलिसांची पहाटेची कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या सुशील अशोक मगरे या बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्याने कारागृहातील अन्य कैदी गौरव पाटील आणि सागर पाटील यांच्यासह २५ जुलैला पलायन केले होते.

पहुर (जामनेर) : जळगाव जिल्हा कारागृहातून रक्षकाच्या कपाळाला बंदूक लावून २५ जुलैला तीन कैदी फरार झाले होते. यातील मुख्य सूत्रधार असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सुशील मगरे हा फरार कैदी पुन्हा पोलिसांच्या तावडीत सापडला. पाच महिन्यांपासून फरार असलेला मगरे यास पहूर पोलिसांनी शिताफीने पकडले. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्‍यास अटक केली.

दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या सुशील अशोक मगरे या बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्याने कारागृहातील अन्य कैदी गौरव पाटील आणि सागर पाटील यांच्यासह २५ जुलैला पलायन केले होते. कारागृहातील रक्षकाच्या कपाळाला बंदूक लावून जगदीश पाटील याच्या मदतीने फरार झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महिन्याभरानंतर तिघांना अटक केली होती. हे सर्व जण कारागृहात आहेत. परंतु मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलिस कर्मचारी सुशील अशोक मगरे (रा. पहूर, ता.जामनेर) पोलिसांना चकवा देत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विविध पथक त्याच्या मागावर होते.

पंचवीस फुट उंचीवरून मारली उडी
पहूर पोलिस स्टेशनला रूजू झालेले पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना आज गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सुशील मगरे याच्या लेलेनगर भागातील घरी पोलिसांनी पहाटे साडेपाचच्या सुमारास अचानक धाड टाकली. मात्र पोलिस कुणकुण सुशील मगरेला लागली. यानंतर घरातून पडून जाण्याच्या प्रयत्‍नात २५ फूट उंचीच्या जिन्यावरून खाली उडी मारत पलायनाच्या प्रयत्‍नात होता. या दरम्‍यान पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर ठाकरे यांनी त्याला शिताफीने पकडत अटक केली. त्याच्या खिशात गावठी कट्टा सापडला. सदर कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवरे ,पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख,अनिल राठोड, ज्ञानेश्वर ठाकरे यांनी केली.

कोण आहे मगरे
आरोपी कैदी सुशील मगरे हा १२ सप्टेंबर २०१७ रोजी जळगाव तालुक्यातील म्हसावद पोलीस दुरक्षेत्रात ड्यूटीवर असतांना गुन्हेगारीची टोळी तयार करून नेरी- औरंगाबाद रस्त्यावरील माळपिंप्रीजवळ उभ्या ट्रकच्या चालकाला बंदुकीचा धाक दाखवून लूट केली होती. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात संशयित म्हणून सुशील मगरे याला १९ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर दुसऱ्या गुन्ह्यात रिव्हाल्वरचा धाक दाखवून पुणे शहरातील कोथरुडमधील पेठे ज्वेलर्समधून 10 लाख 19 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना 24 नोव्हेंबर रोजी भरदिवसा घडली होती. यावेळी एकाने गोळीबारही केला होता.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon the prisoner sunil magare police arrested