जळगाव जिल्ह्याला देशपातळीवरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार 

देविदास वाणी
Thursday, 1 October 2020

राज्य पाणी व स्वच्छता मिशन, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्य समन्वयकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना पत्रान्वये कळविले आहे. 

जळगाव ः केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने सामुदायिक शौचालय अभियानात (SSA) उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याला देशपातळीवरील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन ऑक्टोबरला (स्वच्छ भारत दिवस) स्वच्छ सुंदर शौचालय अभियान, सामुदायिक शौचालय अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, जिल्हा आणि राज्य यांना व्हर्चुअल कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

याबाबत राज्य पाणी व स्वच्छता मिशन, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्य समन्वयकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना पत्रान्वये कळविले आहे. जळगाव जिल्हा परिषदेने सामुदायिक शौचालय अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याला प्रथमच देशपातळीवरील पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या शुक्रवारी (ता. २) ऑक्टोबरला राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्र (NIC) जळगाव येथील सभागृहात होणाऱ्या व्हर्चुअल कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. 

याच अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राला तीन पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये कन्हाळगाव (जि. भंडारा) या ग्रामपंचायतीस स्वच्छ सुंदर शौचालय अभियानाचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे; बोरी खुर्द (जि. यवतमाळ) या ग्रामपंचायतीस सामुदायिक शौचालय अभियानातंर्गत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Public Toilet Campaign Jalgaon district ranks third in the country