एक गाव, फलकाचे ठिकाण एकच; अंतर वाढले दोन- तीन किमीचे

बाळकृष्‍ण पाटील
Friday, 8 January 2021

महामार्ग, ग्रामीण रस्‍त्‍यांवर गावांची दिशा आणि अंतर दर्शविणारे फलक पीडब्‍ल्‍यूडी विभागाकडून लावले जातात. पण काही ठिकाणी फलक असूनही दिशा चुकविणारे ठरतात. याचीच प्रचिती एक फलक पाहून आली. अर्थात एक गाव आणि फलकाचे ठिकाणही एकच. तरी देखील गावांचे अंतर वाढल्‍याचे पाहण्यास मिळते.

गणपूर (ता चोपडा) : बांधकाम खात्याच्या बऱ्याच गोष्टींचे काहीवेळा नवल वाटते. ऐका सुविधेसाठी बऱ्याचदा दोन, तीन वेळा खर्च झालेला दिसतो. तेव्हा बऱ्याचदा वाटते, हा खर्च खड्डे भरण्यासाठी कामी आला असता. रस्त्याचे अंतर दाखवणाऱ्या खुणा आणि फलकांचे तसेच आहे. एकाच ठिकाणी असलेले वेगवेगळे फलक एकाच गावाचे वेगवेगळे अंतर दाखवतात. त्यावेळी सहजच वाटते. बांधकाम खात्याकडे वेगळी मोजपट्टी तर नसावी ना! 

खानदेशात अनेक ठिकाणी अनेक वर्षांपासून असे फलक, मैल खुणा दिसून येतात. वास्तविक पाहता अलिकडे सर्वच खाती आणि विभाग कात टाकत असतांना बांधकाम खात्याकडे इतकी तत्परता का नसावी असा प्रश्न निर्माण होतो. एकंदरीत पाहिल्यास सिमेंट खुणा, दगडी खुणा, लोखंडी फलक, रेडियम अक्षरांचे फलक, भले मोठे होर्डींग्स यावरील खर्च खूप मोठा आहे. मात्र असे फलक किंवा खुणा कुठे वाढलेल्या झाडा झुडपात तर कुठे अक्षर नसलेले दिसतात. त्यातून कोणता उद्देश साध्य होत असावा हे तसे कोडेच आहे. 

एकाच जागेवरून वाढले अंतर
गणपूर गावात धुळे, दोंडाईचा जाण्याचा मार्ग आणि अंतर दर्शविणारे दोन फलक एकाच ठिकाणी लावण्यात आले आहेत. एकाच जागेवर असलेले हे फलक किंवा खुणा जेव्हा वर्षानुवर्षे अश्या अंतराच्या चुका दाखवत आहे. अर्थात दोन वेगवेगळ्या फलकावर शहादा शहराचे अंतर एका फलकावर २८ तर दुसऱ्या फलकावर ३० किमी आहे. तेच धुळे शहराचे अंतर ५७ व ५८ किमी असे दर्शविण्यात आले आहे. त्यातून बांधकाम खाते काय साध्य करू इच्छिते हा एक प्रश्नच आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon pwd banner one village but two km distance