esakal | रिझर्व्हेशनने प्रवास करताना आला पॉझिटीव्ह रिपोर्ट; प्रवाशांमध्ये घबराट
sakal

बोलून बातमी शोधा

railway traveling

कर्नाटकमधील असलेला युवक बहिणीच्या लग्नासाठी झाशी येथे जाण्यासाठी यशवंतपूर रेल्वे स्थानकावरुन येथून यशवंतपूर- दिल्ली एक्सप्रेसने (गाडी क्र ०६५२३) एस- १ बोगीतील ५९ क्रमांकाच्या सीटवरुन प्रवास करीत होता.

रिझर्व्हेशनने प्रवास करताना आला पॉझिटीव्ह रिपोर्ट; प्रवाशांमध्ये घबराट

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : बहिणीच्या लग्नासाठी झाशी येथे जाणाऱ्या एका प्रवाशाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जळगाव रेल्वे पोलिसांना मिळाली. सायंकाळी ७.०५ वाजता गाडी जळगाव रेल्‍वेस्‍थानकावर पोहचल्‍यानंतर त्‍यास पोलिसांनी खाली उतरवत महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. 
कर्नाटकमधील असलेला युवक बहिणीच्या लग्नासाठी झाशी येथे जाण्यासाठी यशवंतपूर रेल्वे स्थानकावरुन येथून यशवंतपूर- दिल्ली एक्सप्रेसने (गाडी क्र ०६५२३) एस- १ बोगीतील ५९ क्रमांकाच्या सीटवरुन प्रवास करीत होता. प्रवास करण्यापूर्वी रेल्वे स्थानकावर कोविड तपासणी करण्यासाठी त्याचे नमुने घेण्यात आले होते. काही तासानंतर या युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजले. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून हा मॅसेज रेल्वेच्या लोकेशननुसार जळगाव स्थानकातील रेल्वे पोलिसांना मिळाला. 
 
माहिती मिळताच यंत्रणा कामाला 
रेल्वेतून पॉझिटिव्ह रुग्ण प्रवास करीत असल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल नगराळे यांनी तात्काळ स्वप्निल महाले, अनिल नायडू यांना त्या पॉझिटिव्ह प्रवाशाबाबत माहिती दिली. सायंकाळी ७.०५ वाजेच्या सुमारास यशवंतपूर- दिल्ली एक्सप्रेस जळगाव स्थानकावर आली. येथे प्रवास करीत असलेल्या संबंधित पॉझिटिव्ह प्रवाशाला रेल्वेतून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर सफाई कर्मचारी योगेश फरकांडे व हितेंद्र चांगरे यांनी तो प्रवासी बसलेल्या सीटसह ती संपूर्ण बोगी सॅनिटाईज केली. त्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ करण्यात आली. त्या पॉझिटिव्ह रुग्णास महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

बोगीतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण 
रेल्वेत प्रवास करणारा प्रवासी पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच त्या प्रवाशासोबत प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करण्यापूर्वीच आपली तपासणी करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.