भयानक..रेल्‍वेट्रॅकवर फेसबुक लाईव्ह करत आत्‍महत्‍या; पत्‍नीच्या मृत्‍यूनंतर उचलले पाऊल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

दिपोत्‍सव साजरा झाल्‍यानंतर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. पत्‍नीने विष प्राशन केल्‍यामुळे तिचा मृत्‍यू झाला. पत्‍नी आपल्‍याला सोडून गेली म्‍हणून पतीने देखील टोकाचे पाऊल उचलत रेल्‍वेट्रॅकवर आत्‍महत्‍या केली. विशेष म्‍हणजे ट्रॅकवर उभे राहून अगोदर फेसबुक लाईव्ह करत जगाचा निरोप घेतल्‍याची मन सुन्न करणारी धक्‍कादायक घटना घडली.

जळगाव : पत्नीचा विष प्राशनाने मृत्यू झाल्यानंतर एकाने आत्महत्या केल्याची भयंकर घटना आज जळगावात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने आत्महत्येआधी फेसबुक लाईव्ह करून याची माहिती जगाला दिली आहे.

शहरातील कांचननगर परिसरात रहिवासी प्रमोद शेटे या तरूणाची पत्नी कांचन शेटे (वाणी) हिने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर प्रमोद शेटे याने आज सकाळी रेल्वेखाली आत्महत्या केली. त्याचा मृतदेह आज रूळांवर आढळून आला.

फेसबुक लाईव्हद्वारे आई- वडिलांना निरोप
प्रमोद शेटे याने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह केले. लाईव्ह करताना त्याने आपला चेहरा न दाखविता आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. पत्नी या जगात नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने लाईव्ह व्हिडीओमध्ये म्‍हटले आहे. तसेच आई- वडिलांसह कुटुंबियांचा निरोप घेत त्याने हे लाईव्ह केले आहे. यानंतर त्याने आत्महत्या केली. या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली असून परिवार सुन्न झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon railway track suicide facebook live