esakal | शिधापत्रिका धारकांची नावे बीड जिल्ह्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

reshn card

सध्या कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन आहे. लोकांना काम धंदा, रोजगार नाही. अशा काळात प्रत्येक गरीब कुटुंबाला धान्य मिळेल, असे सरकारचे धोरण आहे. पण यादीतील घोळामुळे अनेक कुटुंब स्वस्त धान्यापासून वंचित आहे.

शिधापत्रिका धारकांची नावे बीड जिल्ह्यात 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावदा : सावद्यासह रावेर तालुक्यातील शिधापत्रिका धारकांची नावे बीड जिल्ह्यातील पुरवठा यादीत दिसत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदार धान्य न देता, परत पाठवीत आहे. यावरून रेशन वितरण प्रणालीतील सावळा गोंधळ संपता संपेना दिसत आहे. 

सध्या कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन आहे. लोकांना काम धंदा, रोजगार नाही. अशा काळात प्रत्येक गरीब कुटुंबाला धान्य मिळेल, असे सरकारचे धोरण आहे. पण यादीतील घोळामुळे अनेक कुटुंब स्वस्त धान्यापासून वंचित आहे. शहरात वाडवडिलांपासून रहिवास असलेले नागरिक आतापर्यंत नेमून दिलेल्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेत होते. मात्र, अचानक त्यांच्या कुटुंबांची नावे हे बीड जिल्ह्यात दाखविण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदाराकडे ८ ते १० शिधापत्रिका अर्थात अंदाजे १०० ते १२५ नावे अशी आहेत, की ती जिल्हाबाहेरच्या पुरवठा विभागाच्या यादीत दाखवीत आहे. त्यांचेकडे रावेर तहसील कार्यालयाचे सही शिक्का असलेले शिधा पत्रिका आहेत. मग त्यांची नावे इतर जिल्ह्यातील यादीत गेलीच कशी? हा मोठा प्रश्न आहे. 
 
पर्यायी व्यवस्था करा 
जिल्ह्याबाहेरच्या यादीत केवळ सावदा येथीलच शिधापत्रिका धारकांची नावे नसून, रावेर तालुक्यातील अनेक गरीब कुटुंबांची नावे जिल्ह्याबाहेरील यादीत गेली आहेत. रावेर तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांची नावे इतर जिल्ह्यातील यादीत गेलीच कशी? याचा शोध पुरवठा विभागाने घेऊन जनतेला न्याय द्यावा. यादीतील हा घोळ कोणी आणि का केला याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत शिधा पत्रिकाधारकांना गावातील स्वस्त धान्य दुकानावर धान्य देण्याची सोय शासनाने करावी, अशी मागणी होत आहे. 
 
आधार लिंक चुकीमुळे घोळ 
ज्यावेळी शिधापत्रिका धारकांच्या कुटुंबातील व्यक्तींचे आधार लिंक करण्यात आले. त्यावेळी डाटा एन्ट्रीचे काम करणाऱ्या बीड जिल्ह्यातील एजन्सीकडून या चुका झालेल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यासाठी आमचा पत्रव्यवहार सुरू आहे. त्यासाठी काही वेळ नक्कीच लागणार आहे, असे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व तालुका पुरवठा निरीक्षक हर्शल पाटील यांनी सांगितले.