कोरोनाचे रुग्ण असूनही प्रतिबंधात्मक क्षेत्र हद्दपार ! 

कोरोनाचे रुग्ण असूनही प्रतिबंधात्मक क्षेत्र हद्दपार ! 

जळगाव : दोन-चार महिन्यांपूर्वी फलक पाहिल्यानंतरच मनात धडकी भरविणारे कंटेन्मेंट झोन अर्थात, प्रतिबंधात्मक क्षेत्राची संकल्पनाच आता हद्दपार झाली आहे. सध्या जिल्ह्यात साडेतीनशे, तर जळगाव शहरात दोनशेवर सक्रिय प्रतिबंधात्मक क्षेत्र असले तरी ते कागदावरच आहेत, प्रत्यक्षात नाही, अशी स्थिती आहे. 

मार्च-एप्रिलपासून हाहाकार उडविणाऱ्या कोरोनाने संपूर्ण देश वेठीस धरला आहे. कोरोनाचा संसर्ग अधिक फैलू नये म्हणून संपूर्ण देश क्वारंटाइन झाला. प्रतिबंधात्मक क्षेत्रही बनला. 

अशी होती संकल्पना 
सुरवातीच्या टप्प्यात मर्यादित रुग्ण सापडत असले तरी खूप खबरदारी घेतली जात होती. ज्या भागात रुग्ण सापडला, त्या परिसरातील संबंधित एक किलोमीटरचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून ‘सील’ केला जात होता. या भागातील सर्व मार्गांवर पत्रे, ताडपत्री ठोकून तो भाग आवागमनास बंद केला जात होता. रुग्ण वाढू लागल्यानंतर हे क्षेत्रही वाढले. शहरातील वस्त्याच्या वस्त्या प्रतिबंधात्मक क्षेत्र बनल्या. 

नंतर मर्यादा केली कमी 
नंतर रुग्ण जसे वाढू लागले आणि बहुतांश परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या अंतर्गत येऊ लागला तशी एक किलोमीटरची मर्यादा कमी करण्यात आली. घराघरांत रुग्ण आढळू लागल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही मर्यादा आणखी कमी होत जाऊन ज्या घरात रुग्ण तेवढे घरच फक्त सील केले जाऊ लागले. विशेष म्हणजे रुग्ण बरा झाल्यानंतरही २८ दिवसांपर्यंत त्या भागात रुग्ण आढळला नाही, तरच तो भाग खुला होत होता. 

अखेरीस संकल्पनाच हद्दपार 
जळगाव जिल्ह्यातही जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आणि रुग्णसंख्या नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे ज्याठिकाणी रुग्ण आढळला, त्या घरावरच फक्त प्रतिबंधात्मक क्षेत्राचे फलक लावले जात होते. घराघरांत रुग्ण आढळू लागले. रुग्णसंख्या ५० हजारांवर पोचली. मात्र, या टप्प्यात ज्या घरात रुग्ण सापडला, त्याठिकाणीही फलक लावले गेले नाहीत. सप्टेंबरनंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली. आता एकूण रुग्णसंख्या ५५ हजारांच्या टप्प्यात असली तरी ॲक्टिव्ह रुग्ण केवळ चारशेच्या जवळपास आहेत. आता तर रुग्ण सापडूनही प्रतिबंधात्मक क्षेत्राचा फलक दिसत नाही. धडकी भरविणारा हा फलकच आता हद्दपार झाला आहे. 

केवळ कागदावरच नोंद 
सध्या जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाची दैनंदिन माहिती येत असताना त्यात प्रतिबंधात्मक क्षेत्राचा उल्लेख आहे. परंतु ती आकडेवारी केवळ कागदोपत्रीच दिसते. कुठेही प्रत्यक्ष जागेवर असे फलक दिसत नाही किंवा कोणतेही घर, भाग सील केलेला नाही. 

अशी आहे स्थिती 
क्षेत्र---- प्रतिबंधात्मक क्षेत्र-- ॲक्टिव्ह 

ग्रामीण---२८६३-----------१०१ 
शहरी-----१५२०-----------४४ 
मनपा-----१७०६-----------२०८ 
एकूण-----६०८९----------३५३ 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com