दवाखाने उद्या राहणार ; बंद‘आयएमए’च्या संपात ‘आयुष’चा सहभाग नाही 

दीपक कच्छवा
Thursday, 10 December 2020

‘आयएमए’च्या नियोजित संपात आयुष डॉक्टर सहभागी होणार नसल्याचा एकमुखी निर्णय आयुष कृती समितीने घेतला आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांनी शुक्रवारी (ता. ११) पुकारलेल्या संपात आयुष डॉक्टर सहभागी होणार नसल्याचे बैठकीत ठरले असल्याचे प्रेस ॲन्ड पब्लिसिटी कमिटी (निमा) महाराष्ट्र राज्याचे डॉ. संदीप निकम यांनी कळविले आहे. 

नक्‍की वाचा- अनर्थ टळला; ठोका चुकविणारी गॅसकंटेनर- ट्रकची धडक 

‘आयएमए’च्या नियोजित संपात आयुष डॉक्टर सहभागी होणार नसल्याचा एकमुखी निर्णय आयुष कृती समितीने घेतला आहे. आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी) क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व प्रमुख संघटनांनी एकत्र येऊन ‘आयुष कृती समिती’ या नावाने शिखर संघटनेची स्थापना केली आहे. समितीच्या झेंड्याखाली सर्व संघटना आगामी काळात एकत्र काम करतील, अशी घोषणा समितीच्या बैठकीत करण्यात आली. आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेला परवानगी देण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी (ता. ११) राज्यातील दीड लाखाहून अधिक आयुष डॉक्टर गुलाबी फीत लावून वैद्यकीय सेवा देतील. केंद्र शासन व भारतीय चिकित्सा परिषदेच्या अभिनंदनाची पत्रे सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना देतील. 

आयएमएचा प्रयत्‍न दुर्दैवी
प्रेस ॲन्ड पब्लिसिटी कमिटी (निमा) महाराष्ट्र राज्याचे डॉ. संदीप निकम यांनी सांगितले, की सरकारच्या निर्णयामुळे रुग्णसेवेतील कायदेशीर अडथळा दूर झाला आहे. आयुष कृती समितीने सांगितले, की आयुर्वेदिक डॉक्टरांचे प्रशिक्षण, गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा ‘आयएमए’चा प्रयत्न दुर्दैवी आहे. या निर्णयाविरोधात ‘आयएमए’ निष्कारण संभ्रम निर्माण करत आहे. शासनाच्या निर्णयाने ग्रामीण भागात चांगले शल्यचिकित्सक उपलब्ध होणार आहेत. आयुर्वेदाच्या पदवीधरांना मिश्रचिकित्सेला परवानगीविरोधात ‘आयएमए’ने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण अंतरिम स्थगितीस न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. सर्वोच्च न्यायालयातही याचिका फेटाळली आहे. या स्थितीत ‘आयएमए’ने संभ्रम निर्माण करू नये. चाळीसगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. सुजित वाघ, सचिव भारत सुतवणे, डॉ. प्रवीण भोकरे, डॉ. सुधीर देसले, डॉ. संदीप देशमुख, डॉ. पुष्कर घाटे आदी उपस्थित होते.  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon ima stike and hospital closed tomarrow