
जिल्ह्यातील ४३ वाळू घाटांचे प्रस्ताव राज्याच्या पर्यावरण समितीकडे पाठविण्यात आले होते. या पर्यावरण समितीची बैठक नुकतीच ऑनलाइन झाली.
जळगाव : जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया अद्याप अंतिम टप्प्यात यायला तयार नाही. त्यासंबंधीच्या प्रस्तावात काही दुरुस्त्या राज्याच्या पर्यावरण समितीने सुचविल्या असून, त्यातील दुरुस्तीनंतर पुन्हा पर्यावरण समितीची बैठक होऊन वाळूघाटांच्या लिलावाचा निर्णय होणार आहे. लिलावप्रक्रिया न झाल्याने वाळूचोरीचे प्रकार प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढविणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील गिरणा आणि तापी नदीपात्रातील वाळूला राज्यात, तसेच राज्याबाहेरही चांगली मागणी आहे. त्यामुळे या ठिकाणचे वाळूघाट घेण्यासाठी राज्यभरातून ऑनलाइन बोली लावल्या जातात. मागील वर्षापासून मात्र वाळू लिलावप्रक्रिया प्रशासकीय धोरणांमुळे खोळंबली आहे. जिल्ह्यातील ४३ वाळू घाटांचे प्रस्ताव राज्याच्या पर्यावरण समितीकडे पाठविण्यात आले होते. या पर्यावरण समितीची बैठक नुकतीच ऑनलाइन झाली.
अशा निघाल्या त्रुटी
यात ४३ पैकी १८ वाळूघाट एक हेक्टरपेक्षा कमी असून, ते रिव्हाइज करण्याच्या सूचना राज्याच्या पर्यावरण समितीने दिल्या आहेत, तर उर्वरित २५ घाटांसंदर्भात नव्याने आराखडा तयार करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व दुरुस्त्या झाल्यानंतर पुन्हा पर्यावरण समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. हे प्रस्ताव गेल्यानंतर पर्यावरण समितीची बैठक होऊन त्यात लिलावप्रक्रियेला मंजुरी मिळेल.
पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया राबविल्यानंतर बैठक होऊन त्याला मंजुरी मिळेल. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानेही लिलावांना फारसा प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
या वाळूघाटांची प्रक्रिया
रावेर तालुका : वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बुद्रुक, केऱ्हाळे बुद्रुक, धुरखेडा, पातोंडी, दोधे, बलवाडी.
यावल तालुका : थोरगव्हाण, पिंप्री.
चोपडा : पिंप्री, घाडवेल, कोळंबा, सुटकार, धावडे, रुंधाटी- १ व २, सावखेडा, हिंगोणेसिम प्र. ज. भाग १ व २.
धरणगाव : बांभोरी प्रचा, आव्हाणी, नारणे, बाभूळगाव १ व २.
एरंडोल : टाकरखेडा, वैजनाथ, उत्राण अ.ह.
पारोळा : बहादरपूर, महालपूर, उंदीरखेडे १ व २.
भुसावळ : जोगलखेडा, भानखेडा, गोंभी, सुनसगाव, बेलव्हाय भाग १, २, ३.
जळगाव : भोकर आणि पळसोद
संपादन-भूषण श्रीखंडे