‘सातबारा’ मिळणार नवीन रूपात; युनिक कोड अन्‌ वॉटरमार्क! 

देविदास वाणी
Thursday, 10 September 2020

बारा प्रकारचे बदल असलेला ‘सातबारा’ तयार करण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. त्याबाबत अध्यादेश येताच सातबारा उताऱ्यात बदल करून नवीन ‘सातबारा’ दोन महिन्यांत तयार करून मिळकतधारकांना देता येईल. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असलेला हा ‘सातबारा’ असेल. 
- रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (महसूल)) 

जळगाव : राज्यात तब्बल आठ दशकांनंतर नवीन महसूल रचना अमलात येणार आहे. आता सातबारा उताऱ्यात तब्बल १२ प्रकारचे बदल करण्यात येणार आहेत. प्रत्येक गावासाठी युनिक कोड, वॉटरमार्कसह शासनाचा लोगो, क्यूआर कोड, असा वैशिष्ट्यपूर्ण सातबारा उतारा दोन महिन्यांत जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे. 
जिल्ह्यात तब्बल १२ लाख ६० हजार मिळकतधारक आहेत. नवीन प्रकारचा बदलयुक्त ‘सातबारा’ तयार करण्याच्या अध्यादेश अद्याप जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला नाही. आदेश येताच सातबारा उतारा नवीन प्रकारचा तयार करण्यासाठी तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 
राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत महाराष्ट्रातील ग्रामपातळीवरील महसुली लेखांकन पद्धतीत बदल करण्यात आला आहे. ब्रिटिश काळात एम. जी. हार्टनेल अँडरसन यांनी तयार केलेल्या मॅन्युअलमध्ये १९४१ मध्ये एम. जे. देसाई यांनी सुधारणा केल्या होत्या. त्यानंतर जवळपास आठ दशकांनंतर राज्यात नवी महसूल रचना अमलात येत आहे. ‘सातबारा’मध्ये साधारण १२ प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. यापुढे आता प्रत्येक गाव, खातेदाराला स्वतंत्र कोड क्रमांक देण्यासोबत गाव नमुना नंबर ७ अधिकार अभिलेख पत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 
 
हेक्टरसोबत चौरस मीटरची नोंद 
गाव नमुना नंबर सातमध्ये गावाच्या नावासोबत स्थानिक शासनाचा कोड दर्शविण्यात येणार आहे. याशिवाय लागवडयोग्य, पोटखराब क्षेत्राचे एकूण क्षेत्र यापुढे दर्शविले जाणार आहे. सध्या अनेक उताऱ्यांमध्ये त्यांचे क्षेत्र जुळत नाही. मात्र, आता अशी अडचण येणार नाही. हेक्टर, आर.सोबत अकृषक उताऱ्यावर चौरस मीटर नोंदले जाणार आहे. इतर हक्काच्या रकान्यांत खातेदारांचे क्रमांक युनिक क्रमांकासह नोंदले जातील. सातबारा उताऱ्यातील नव्या बदलामुळे राज्यातील जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसूलविषयक वाद कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास सर्वसामान्यांना आहे. 
 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon satbara lowered in new format unik code