आतापर्यंत होते अंधारात; विद्युत दिव्यांचा लखलखाट पाहून भारावले

राजेश सोनवणे
Monday, 28 September 2020

सातपुडा पर्वत रांगाचा पायथा असलेल्‍या भागात आदिवासी वस्‍ती आहे. या वस्‍तीत झोपडी करून राहणारे झोपडीत दिवा लावून राहत होते. सायंकाळ झाली की दुरवर चमकणारे एलइडीचे लाईट दिसायचे. पण हे दिवे आपल्‍या झोपडीत कधी लागणार याचे स्‍वप्न होते. तो दिवस उजाळला आणि घरात लाईट आली व झोपडीतील लखलखाट पाहून सारेजण भारावले.

जळगाव : चोपडा तालुक्‍यातील अडावद- उनपदेवपासून जवळ असलेल्या रामजीपाडा या आदिवासी भागात गेल्या ३५ वर्षानंतर वीज नव्हती. या आदिवासी भागातील झोपड्यांमध्ये विद्युत लाईन पोहचल्‍याने आदिवासी बांधव सुखावले. 

चोपडा मतदार संघाचे आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने या आदिवासी पाड्यात वीज पोहचली. त्यांचे अंधकारमय भाग आज विजेच्या दिव्यांनी लखलखला. रामजी पाडा या आदिवासी भागात ३५ वर्षानंतर वीज आल्याने अदिवासी बांधवांना विविध लोकोपयोगी व जनहिताच्या योजना खेडोपाडी पोहोचतील; असा आशेचा किरण आमदार लता सोनवणे यांनी निर्माण केल्‍याची भावना येथील रहिवाशांची आहे. आमदार श्रीमती सोनवणे यांच्या हस्‍ते लाईट सुरू करण्यात आली. याप्रसंगी अडावदच्या सरपंच भावना माळी, भारती महाजन, संजीव शिरसाठ, सहा.वीज अभियंता पंकज बाविस्कर, सहा.पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, गुलाब बारेला, प्रकाश राजपूत आदी उपस्‍थित होते.

लाईटच्या प्रकाशात प्रथमच स्‍वयंपाक
चोपडा मतदार संघाच्या आमदार लता सोनवणे यांनी रामजी पाडा येथे विज लाईन पोहचविली. यामुळे झोपडी प्रकाशमान झाली. अंधारात राहणाऱ्या या नागरीकांना उजेडातील रात्र वेगळाच आनंद देणारी राहिली. या उजेडात प्रथमच चुल पेटवून स्‍वयंपाक करण्याचे चित्र येथे पाहण्यास मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon satpuda aria ranjanpada first time line connection