शाळा सुरू होण्यासोबतच राबविले जाणार अभियान

देविदास वाणी
Sunday, 15 November 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर आठ महिन्यांपासून शाळांच्या वर्गांना कुलूप असून तेथील किलबिलाट देखील बंद आहे. आठ महिन्यानंतर म्‍हणजे २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असून, विद्यार्‍थ्‍यांचे कोरोनापासून संरक्षण याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे. यासोबतच लहान मुले देखील व्यसनाच्या आहारी गेलेले असतात. त्‍यांना दूर ठेवण्यासाठी शाळांमध्ये तंबाखूमुक्‍त शाळा अभियान देखील राबविले जाणार आहे.

जळगाव : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन समाजासाठी घातक असल्याने त्याचे निर्मुलन आणि उच्चाटन होण्याकरीता किशोरवयीन मुलांना तंबाखूजन्य व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. याकरीता जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

तंबाखू नियंत्रण व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके विविध जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदि उपस्थित होते.

शालेय आवार परिसरात खबरदारीचे आदेश
जिल्हाधिकारी राऊत यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये तंबाखू किंवा तत्संबंधी पदार्थांच्या सेवनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याचा व्यापक प्रचार व प्रसार करण्याच्या सुचना आरोग्य, शिक्षण तसेच सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच 12 ते 17 वयोगटातील किशोरवयीन मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रामुख्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती, शाळा महाविद्यालय परिसराच्या 100 मीटरपर्यंत अशा कुठल्याही वस्तु विकल्या जाणार नाही याची खबरदारी घेणेबाबतत सूचना केल्या. तंबाखूचे सेवन करणाऱ्या नागरीकांचे समुपदेशन करावे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, गुटखा सेवन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात.

साहित्‍याचे अनावरण
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी तंबाखू नियंत्रण समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात तंबाखू नियंत्रणाच्या कामाचा सविस्तर आढावा सादर केला. तर डॉ. भारती यांनी समितीमार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तंबाखूमुक्त अभियानाच्या प्रचार साहित्याचे अनावरण करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon school aria tobacco free school abhiyan statr district