esakal | वर्षभर शोध सुरू, तरी काँग्रेसला जळगाव शहरात शहराध्यक्ष गवसेना ! 
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षभर शोध सुरू, तरी काँग्रेसला जळगाव शहरात शहराध्यक्ष गवसेना ! 

जिल्ह्यात काँग्रेस बळकट आहे. मात्र वरिष्ठ नेतेच लक्ष देत नाही, आम्हाला विधानसभेची केवळ एक जागा देण्यात आली तीही आम्ही निवडून आणली आमचे शंभर टक्के यश असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला.

वर्षभर शोध सुरू, तरी काँग्रेसला जळगाव शहरात शहराध्यक्ष गवसेना ! 

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : ग्रामपंचायतीपासून, तर थेट लोकसभेपर्यंत स्वबळावर निवडणूक लढविण्यास काँग्रेस सक्षम असल्याची घोषणा शुक्रवारी (ता. ६) काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केली. मात्र अद्याप पक्षाला शहराध्यक्ष पदासाठी वर्षभरापासून पदाधिकारीच सापडलेला नाही. त्यामुळे निवडणुका लढविण्यासाठी तरी काँग्रेस ताकदवान आहे काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

वाचा- घरकुल घोटाळा : अपात्रता प्रकरणी न्यायालयाची पाच  नगरसेवकांसह आयुक्तांना नोटीस

विधानसभा निवडणुकीत महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्यानंतर ते पद रिक्तच आहे. वर्षभरापासून या पदावर पक्षाला व्यक्ती मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसचा जुना मित्रपक्ष आहे. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ जिल्ह्यात ताकदवान पक्ष होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसलाही बळ मिळेल, असे सांगितले जात आहे. परंतु जिल्ह्याचे संपर्कमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जिल्ह्यात काँग्रेस बळकट आहे. मात्र वरिष्ठ नेतेच लक्ष देत नाही, आम्हाला विधानसभेची केवळ एक जागा देण्यात आली तीही आम्ही निवडून आणली आमचे शंभर टक्के यश असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला. याच वेळी त्यांनी जिल्ह्यात निवडणुकीत पक्षाच्या वाट्याला आघाडीत कमी जागा मिळाल्याचा आरोपही केला. तर मित्रपक्षात आलेले एकनाथ खडसे यांच्याबाबतीतही जुन्या वादातून खदखद व्यक्त केली. मात्र, पक्षाचे जिल्हा संपर्कमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी बाजू सावरून घेत खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे काँग्रेसलाही फायदा होईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता पुन्हा जिल्ह्यात काँग्रेसच्या ताकदीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

आवश्य वाचा- खडसेंचा दणका सुरूच ; हजारो भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश !

स्थानिक नेते गप्प कसे? 
महानगराध्यक्ष वर्षभरापासून नियुक्त का झाला नाही, याबाबत नेते गप्प आहेत. विशेष म्हणजे महानगराध्यक्ष नियुक्तीबाबत एकाही नेत्याने वरिष्ठाकडे प्रस्ताव ठेवला नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत स्वबळावर निवडणुका कोणत्या आधारावर लढणार? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. तीस वर्षांपासून पंजा चिन्हावर नगरसेवक पालिका व महापालिकेत निवडून आलेला नाही. अशा स्थितीत महानगरात काँग्रेसला अध्यक्षच नसेल, तर पक्षाचे कार्य कसे चालणार व पक्ष कसा बळकट होणार, हा प्रश्‍नच आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top